महापालिकेच्या आणखी तीन शाळा ‘हायटेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या आणखी तीन शाळा ‘हायटेक’
महापालिकेच्या आणखी तीन शाळा ‘हायटेक’

महापालिकेच्या आणखी तीन शाळा ‘हायटेक’

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मुंबईतील महापालिकेच्या तीन शाळांची दुरुस्ती करून त्यांचा दर्जा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे, माटुंगा लेबर कॅम्प क्र. एक आणि झकेरिया मार्ग मालाड मराठी शाळा क्र. एक शाळांचा त्यात समावेश आहे. तिन्ही शाळा धोकादायक झाल्या असून त्या ‘सी टू बी’ वर्गात मोडत असल्याने त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

महापालिकेच्या जुन्या शाळा टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. त्यातील बऱ्याच शाळा सुमारे ५० वर्षे जुन्या झालेल्या असल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत. सध्या त्या ‘सी टू बी’ वर्गात मोडत असल्या, तरी ‘सी १’पर्यंत त्या पोहचू नयेत म्हणून महापालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्ष विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत ई विभाग, सी विभाग आणि एफ उत्तर विभागातील शाळांची डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन शाळांच्या इमारतीच्या परिस्थितीनुसार अंदाजपत्रक व मसुदा निविदा काढण्यात येणार आहे.

मालाडमधील शाळेचे परीक्षण मे स्पेस डिझाईन अॅण्ड सन्स यांनी केले असून अंदाजपत्रक व मसुदा निविदेसाठी मे. ट्रायोआर्च कन्सल्टंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेबर कॅम्प १ शाळेसाठी मे. मास्टर ॲण्ड असोसिएट्स यांची अंदाजपत्रक व मसुदा निविदेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मे. रेट्रोफिल्टर्स यांनी शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेची दुरुस्ती सुचवली असून अंदाजपत्रक व मसुदा निविदेसाठी मे. डी. डी. कुलकर्णी यांची निवड झाली आहे. मालाडमधील शाळेच्या इमारतीला ३० वर्षे पूर्ण झाली आहे.
धारावीतील शाळा इमारत ९७ वर्षे जुनी असून ती ‘सी २ बी’ वर्गात मोडते. इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र ७१९.५८ चौ. मी. आहे. शाळेच्या संपूर्ण कामासाठी कर व अन्य असा एकूण १ कोटी १ लाख ६० हजार रुपये इतका खर्च होणार आहे.
शिवडीतील प्रबोधनकार ठाकरे शाळा इमारत ३० वर्षे जुनी असून ती ‘सी २ बी’ वर्गात मोडते. शाळेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे वर्ग दोन सत्रांत भरत असून ९११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र २ हजार ९०५.८७ चौ. मी. आहे. शाळेच्या संपूर्ण कामासाठी कर व अन्य असा एकूण ३ कोटी ७४ लाख १२ हजार ४६८ रुपये खर्च होणार आहे. तिन्ही कामांच्या निविदा महापलिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. येत्या एक ते दीड वर्षात शाळा नव्या रूपात व अत्याधुनिक करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

असे असेल नवे रूप
शाळांच्या नवीन इमारतीच्या खांबांना मायक्रो काँक्रीटिंग आणि जॅकेटिंग, स्लॅब-पिलर, खांब, तुळईची कामे, नव्याने शौचालये बांधणी, नवे व्हरांडे, नव्या खिडक्या, वर्षा जलसंचयन प्रणाली, नव्याने गच्चीत जलभेदीकरण, विद्युतीकरण, कुंपण भितींची दुरुस्ती आणि आतून-बाहेरून रंगकाम केले जाणार आहे. काही शाळांची आवश्यकतेनुसार तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.