शिवशाही बसची प्रवाशांना डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाही बसची प्रवाशांना डोकेदुखी
शिवशाही बसची प्रवाशांना डोकेदुखी

शिवशाही बसची प्रवाशांना डोकेदुखी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ज्या वेगाने शिवशाही वातानुकूलित बस रस्त्यांवर आणण्यात आल्या, त्याच वेगाने नामशेष होताना दिसून येत आहेत. या शिवशाही बससाठी एसटी प्रशासनाने साध्या बसचे थांबे, मार्ग बंद केले होते. परिणामी ग्रामीण भागातील प्रवासी खासगी वाहतूकदारांकडे वळला; तर लांब पल्ल्यांच्या प्रवाशांनी शिवशाहीला पसंती दिली. मात्र आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डोकेदुखी ठरत असल्याने शिवशाही बसकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे दिसते आहे.
सुरुवातीला सुमारे १५०० च्या घरात शिवशाही बसची संख्या होती. यामध्ये सुमारे एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. सुमारे ५०० शिवशाही बस एसटीच्या मालकीच्या होत्या. खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांशी होणारी गैरवर्तणूक आणि अपघात, सुविधांच्या अभावामुळे भाडेतत्त्वावरील शिवशाहीमुळे एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागला. त्यासोबतच एसटीच्या शिवशाहीसुद्धा तोट्यात गेल्याचे सध्या चित्र आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून शिवशाही बसची स्वच्छता आणि सुविधेचा दर्जा कायम राखता आला नसल्याने आता झपाट्याने प्रवासी घटले आहेत.
राज्यात सध्या धावत असलेल्या अनेक शिवशाही बस सुस्थितीत नसल्याने प्रवाशांची डोकेदुखी ठरत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे. शिवशाहीमुळे होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे एसटी प्रशासनाने भाडेतत्त्वावरील शिवशाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही सुमारे ५०० पेक्षा जास्त शिवशाही बस अद्याप एसटीच्या सेवेत प्रवासी सेवा देत आहेत.
...
एसटीच्या ताफ्यात सध्या काही प्रमाणात भाडेतत्त्वावर; तर काही एसटीच्या मालकीच्या शिवशाही बस आहेत. वातानुकूलित सेवेच्या तक्रारी आधी सर्वाधिक झाल्या आहेत; मात्र आता नादुरुस्तीचे प्रमाण कमी झाले आहे. शिवशाहीच्या बसची संख्या निश्चित सांगता येणार नाही.
- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, वाहतूक