पाया भक्कम करण्यासाठी माता-पालक गट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाया भक्कम करण्यासाठी माता-पालक गट
पाया भक्कम करण्यासाठी माता-पालक गट

पाया भक्कम करण्यासाठी माता-पालक गट

sakal_logo
By

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पहिली ते तिसरीतील मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच राज्यात २ लाख १० हजार ३४० माता-पालक गटांकडून मुलांकडून आपल्याच घरी शिक्षणाचे धडे गिरवून घेतले जात आहेत. आपल्या मुलांना शिक्षणातील अनेक गोष्टी सांगताना कृती व अभ्यास करून घेण्यासाठी हे गट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
राज्यात निपुण भारतच्या अंतर्गत राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. यात पहिली ते तिसरीतील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे मुख्य उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २ लाख १० हजार ३४० माता-पालक गट सहभागी झाले आहेत. गाव-खेड्यांपासून ते पालांपर्यंतच्या माता आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या पायाभरणीसाठी या अभियानात सहभागी होऊन आपल्या मुलांच्या शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी पुढाकार घेत असल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात एका नव्या बदलाची नांदी सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.
...
कृती, अभ्यासाच्या माध्यमातून धडे
राज्यातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर माता-पालक गट स्थापन करण्यात आले असून त्यात पहिली ते तिसरीतील मुलांसोबत माता गट आणि शिक्षकांनाही विविध कृती व खेळ घेण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. घरी मुलांसोबत माता-पालकांनी क्रिया, कृती करून त्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
...
अनुभव, आयडियांचे व्हिडीओ
माता गटांना प्रत्येक आठवड्यांतून दिवसातून आपल्याला येत असलेले अनुभव शेअर करण्यासाठी ९०१११३१३६१ हा व्हाट्सॲप नंबर देण्यात आला आहे. त्यावर माता गटांकडून त्यांच्या होणाऱ्या बैठकांचे फोटो आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत. दुसरीकडे प्राथमिक शिक्षण परिषदेकडून प्रत्येक आठवड्याला ‘माता-पालक गट आयडिया व्हिडीओ’ नावाने व्हिडीओ तयार करून ते पालकांपर्यंत पोहोचवले जात आहेत.
...
कोट
महाराष्ट्र निपुण अभियानाच्या माध्यमातून आम्हाला खेळत, कृती करत मुलांना अभ्यासाचे महत्त्व कसे पटवून द्यायचे याची माहिती मिळाली. त्याचा खूप लाभ होत असून मुलांसोबत आम्हीही त्यातून शिक्षित होत आहोत. मुलगा कुठे कमी पडत आहे, याची जाणीव होत असल्याने आम्हाला त्याच्या सुधारणेचे मार्ग मिळत असून त्यातून मुलांना शिक्षणाची आवडही निर्माण हेात आहे.
- धनश्री गायकवाड, माता-पालक गट, मुंबई
...
माता गटांची राज्यातील आकडेवारी
जिल्हा गटांची संख्या
अहमदनगर १०,५८८
अकोला ४,०८४
अमरावती ६,१११
औरंगाबाद ५,१८०
बीड ८,९३७
भंडारा ३,११०
बुलढाणा ६,६३४
चंद्रपूर ६,२०३
धुळे ६,६२९
गडचिरोली ३,८६३
गोंदिया ५,००६
हिंगोली ४,१५४
जळगाव १०,१४५
जालना ६,०९७
कोल्हापूर ७,५९८
लातूर ६,४३२
मुंबई ६०
मुंबई उपनगर ५,५३१
नागपूर ३,२१२
नांदेड १०,४०१
नंदुरबार ४,६९३
नाशिक १२,७१०
उस्मानाबाद ५,१७६
पालघर ४,९१३
परभणी ४,३६६
पुणे ८,२५५
रायगड ४,९७८
रत्नागिरी ३,९८२
सांगली ८,०९०
सातारा ७,१५८
सिंधुदुर्ग २,९१४
सोलापूर १०,०२४
ठाणे १,६८१
वर्धा २,८२४
वाशिम ३,५९५
यवतमाळ ५,००६
एकूण २,१०,३४०