सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर
सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर

सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः द वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार सन २०२२ च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) सोन्याची जागतिक मागणी १,१८१ टनांवर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ २८ टक्के असून ही मागणी आता कोविडपूर्व पातळीवर गेली आहे.

गुंतवणुकीसाठीच्या वैयक्तिक मागणीत लक्षणीय घट झाली असली, तरी सोन्याचे किरकोळ ग्राहक आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांमुळे मागणी वाढली. मागील वर्षीच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी सोने घेण्याचे प्रमाण ४७ टक्के कमी आहे. मागणीत घट आणि भविष्यातील अनिश्चितता यामुळे या तिमाहीत सोन्याच्या किमतीतही आठ टक्के घट झाली; तरीही महागाई, चलनवाढ आणि युरोपातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांचे प्राधान्य सोन्यालाच राहिले. बिस्किटे व नाणी यांच्यात जास्त गुंतवणूक झाली.

किरकोळ ग्राहकांची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढली. तुर्कस्थान व जर्मनीसह सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये या गटातून वाढीव मागणी होती. दागिन्यांची खरेदीही कोविडपूर्व पातळीवर आली असून या तिमाहीत ५२३ टन दागिने विकले गेले. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात १० टक्के वाढ झाली. भारतात मागील वर्षीच्या तुलनेत दागिन्यांची मागणी १७ टक्के वाढून १४६ टनांवर गेली. सौदी अरेबियातही दागिन्यांचा खप २० टक्के; तर संयुक्त अरब अमिरातींमध्ये खप ३० टक्के वाढला. चीनमध्ये खपात मागील वर्षीच्या तुलनेत फक्त पाच टक्के वाढ झाली.
-----
विविध देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्याकडील सोन्याचे साठे वाढवण्याच्या विचारात असून या तिमाहीत त्यांच्याकडून चारशे टन सोन्याची खरेदी होईल असा अंदाज आहे. खाणीमधील सोन्याचे उत्पादन दोन टक्के वाढले; तर दागिन्यांच्या पुनर्वापराचे प्रमाण सहा टक्के घटले. मध्यवर्ती बँकांची व किरकोळ गुंतवणूकदारांची खरेदी सुरूच राहील; तर भारत व आग्नेय आशियातील दागिन्यांची मागणीही वाढेल.
- लुईस स्ट्रीट, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल