तलावातील जाळ्यात माशाऐवजी मगर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावातील जाळ्यात माशाऐवजी मगर!
तलावातील जाळ्यात माशाऐवजी मगर!

तलावातील जाळ्यात माशाऐवजी मगर!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : आरे कॉलनी परिसरातील स्थानिक रहिवाशांना पाण्यासाठी खोदलेल्या छोट्या तलावात मासासदृश हालचाली जाणवल्या. त्रिभुज स्थानिक प्रजातीमधील मासा असल्याच्या संशयातून रहिवाशांनी त्याला पकडण्यासाठी जाळेही लावले; मात्र जाळ्यात चक्क मगर अडकल्याचे लक्षात येताच रहिवाशांची धावपळ उडाली. अखेर माहिती मिळताच वन विभागाने जाळ्यात अडकलेल्या मगरीला ताब्यात घेतले आहे.

आरे कॉलनीत मंगळवारी (ता. १) दुपारी एकच्या सुमारास ही मगर पकडण्यात आली. आरे कॉलनीतील युनिट क्र. ३१ जवळ गोड पाण्याचा तलाव आहे. या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. शिवाय तलावात मासेमारीदेखील होते. स्थानिक रहिवासी ठराविक कालावधीने तलावाची साफसफाई करतात. मंगळवारी अशीच साफसफाई करण्यात येत होती. त्यादरम्यान आंबावाडी येथील स्थानिक रहिवासी चंदन चव्हाण यांना पाण्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या हालचाली दिसल्याने स्थानिक जातीचा मासा असल्याचे समजून त्याला पकडण्यासाठी त्यांनी तलावात जाळे टाकले; परंतु जाळ्यामध्ये मगर अडकल्याचे दिसताच त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली.

वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन्यप्रेमींनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीला ताब्यात घेतले. ही मगर उप-प्रौढ भारतीय मार्श मगर म्हणून ओळखली जाते. ही मादी जातीची मगर असून तिचे वय दीड वर्ष असल्याचे समोर आले आहे; तर तिची लांबी ३ फूट ३ इंच; तर वजन १.७ किलो असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण बचावकार्य एक तास चालले. वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली
राकेश बोहीर आणि रोहित मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वेळी वनविभागाचे सुरेंद्र पाटील सोबत होते.

भीतीचे वातावरण
कोरोना काळात दोन मगरींना आरेच्या रॉयल पाल्म येथून पकडण्यात आले होते. तुलसी, विहार आणि पवई तलावात मगरींचा वावर असून तिथून या मगरी आरे कॉलनीत येत असाव्यात, अशी शंका व्यक्त केली जात आहे; मात्र काही दिवसांपूर्वीच आरे कॉलनीमध्ये झालेले बिबट्याचे हल्ले आणि आता मगरीचा वावर यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.