संभाजी भिडेंचा समाज माध्यमावर निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी भिडेंचा समाज माध्यमावर निषेध
संभाजी भिडेंचा समाज माध्यमावर निषेध

संभाजी भिडेंचा समाज माध्यमावर निषेध

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : ‘कुंकू लाव, तरच बोलेन’ अशा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्याविरोधात समाज माध्यमांवर निषेध व्यक्त करण्यात आला. #टिकलीचाआग्रहनकोच या हॅशटॅग अंतर्गत अनेकांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यामध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, काँग्रेस नेत्या चारुशीला टोकस, मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी भिडे यांचा समाचार घेतला.
‘साम टीव्ही’च्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी बुधवारी मंत्रालयात आलेल्या संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलेन’ असे वादग्रस्त विधान केले. या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘सावित्री-जिजाऊच्या लेकी... लेकी महाराष्ट्राच्या... महान भारतमातेच्या... आम्ही सोबत आहोत’, असे ट्विट करत रुपाली यांना पाठिंबा दिले.
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ही टिकलीचा आग्रह नकोच अशी भूमिका मांडली आहे. मी कुंकू-टिकली लावते. गेल्या काही वर्षांपासून तर मोठे कुंकू लावते. कारण मला आवडते; पण उद्या मला कुणी कुंकू किंवा टिकली लावण्याची सक्ती केली, तर मी लावणार नाही! असे ट्विट त्यांनी केले. काँग्रेस नेत्या चारुशिला टोकस यांनीही ट्विटद्वारे भिडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यासारखे विकृत जोपर्यंत या देशातील हिंदू धर्मातील बुरसटलेल्या प्रथा-परंपरांचे उदात्तीकरण करत राहतील आणि त्यासाठी महिलांचा अपमान करूनही समाजातील, त्यांच्या प्रतिष्ठेला किंचितही तडा जाणार नाही. तोपर्यंत देशाच्या विकासाचे स्वप्न स्वप्नच राहील, अशा शब्दात त्यांनी भिडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
---
चॉईस ज्याचा त्याचा!
समाजातील अनेक मान्‍यवर, पत्रकारांनीही समाज माध्यमांवर व्यक्त होत भिडे यांचा निषेध केला आहे. ‘टिकली न लावणारी बाई वाईट नाही, हे सिद्ध करायला तिचं कर्तृत्त्व कशाला लिहायचं, ती बाई पार रिकामटेकडी असेना का, टिकली लावणं न लावणं त्या बाईचा चॉईस. जसा मिशा ठेवणं हा त्या भिडेचा किंवा पुरूषाचा चॉईस आहे’, अशा शब्दात थेट खडसावले.
........