‘द स्पिरिट पिलग्रीमेज’ पुस्तकाच्या मराठीत भाषांतरासाठी याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘द स्पिरिट पिलग्रीमेज’ पुस्तकाच्या मराठीत भाषांतरासाठी याचिका
‘द स्पिरिट पिलग्रीमेज’ पुस्तकाच्या मराठीत भाषांतरासाठी याचिका

‘द स्पिरिट पिलग्रीमेज’ पुस्तकाच्या मराठीत भाषांतरासाठी याचिका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : गांधीवादी कार्यकर्त्या मेंडलिन स्लेड ऊर्फ मीरा बेन यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘द स्पिरिट पिलग्रीमेज’ पुस्तकाचे मराठीत भाषांतर आणि प्रकाशन करण्याची परवानगी मिळण्यासाठी एका ८२ वर्षीय वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मीरा बेन यांच्या आत्मचरित्रपर असलेल्या या पुस्तकाचे मूळ प्रकाशकांचा ठावठिकाणा मिळत नाही. त्यामुळे मी उच्च न्यायालयात याचिका करत आहे, असे ॲड. अनिलकुमार कारखानीस यांनी याचिकेत म्हटले आहे.

कॉपीराईट कायद्याच्या कलम ३२ नुसार ही याचिका करण्यात आली आहे. यापूर्वी याचिकेवर न्या. मनीष पितळे यांच्यापुढे सुनावणी झाली होती. कॉपीराईट रजिस्ट्रारनी यासंबंधी एक नोटीस प्रसिद्ध करावी, असे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले होते. मीरा बेन यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला समर्थन केले होते. १९२० मध्ये त्यांनी इंग्लंड सोडले आणि त्या महात्मा गांधींच्या चळवळीत सहभागी झाल्या. त्यानंतर गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

ओरिएंट लॉगमेन प्रा. लि. या प्रकाशन संस्थेने १९६० मध्ये प्रथम भारतात त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले; तर इंग्लंडमध्ये लॉगमेन्स, ग्रीन एड कंपनीने आत्मचरित्र प्रसिद्ध केले. १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाच्या अनुवादित प्रकाशनासाठी परवाना मिळण्याबाबत सर्व शर्ती पूर्ण केल्या आहेत. तसेच संबंधित व्यक्तींना रॉयल्टीदेखील देण्यात येईल, असे ॲड. कारखानीस यांनी म्हटले आहे. न्यायालयाने याबाबत कॉपीराइट जर्नलमध्ये आणि दोन वर्तमानपत्रामध्ये नोटीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.