आरे मध्ये वृक्षांची छाटणी : पर्यावरणवादी संघटनांचा आक्षेप; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरे मध्ये वृक्षांची छाटणी :  पर्यावरणवादी संघटनांचा आक्षेप;
आरे मध्ये वृक्षांची छाटणी : पर्यावरणवादी संघटनांचा आक्षेप;

आरे मध्ये वृक्षांची छाटणी : पर्यावरणवादी संघटनांचा आक्षेप;

sakal_logo
By

‘आरे’मध्ये वृक्षांची छाटणी केल्याचा आरोप
मुंबई, ता. ३ : ‘आरे’मधील पिकनिक पॉईंट गार्डनजवळील काही मोठ्या वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. ती गरजेपेक्षा अधिक असून अवैध असल्याचा आरोप पर्यावरणवादी आरे बचाव संघटनेने केला आहे. दरम्यान, झाडांची छाटणी किरकोळ असून उद्यानाच्या पुनर्विकासासाठी ती करण्यात आल्याचे आरे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पिकनिक पॉईंट गार्डनमधील काही झाडांची छाटणी करण्यात आली आहे. गरजेपेक्षा अधिक फांद्या तोडल्याचे आरे बचावचे कार्यकर्ता झोरू भथेना म्हणाले. गार्डनमध्ये जुनी झाडे आहेत. त्यांच्या फांद्याही झाडांइतक्याच मोठ्या आहेत. त्याही मोठ्या प्रमाणावर अवैधपणे तोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महिनाभरापासून काही झाडांच्या बुंध्यात माती टाकली जात आहे. माती चांगली असली तरी ती जास्त प्रमाणात टाकण्यात आल्यामुळेही झाडांना इजा पोचण्याचा धोका आहे, असे झोरू म्हणाले.
मोठ्या प्रमाणात वृक्षछाटणी झाल्याचा आरोप आरे प्रशासनाने फेटाळला आहे. ‘आरे’चे सीईओ डॉ. सुभाष दळवी म्हणाले, की पिकनिक गार्डनचा पुनर्विकास होत आहे. त्यासाठी आवश्यक काम तिथे सुरू आहे. मुलांची खेळणी आणि नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या केवळ दोन झाडांची किरकोळ छाटणी केली आहे. गार्डनचे काम पुढील काही दिवस सुरू राहणार असून झाडांची आवश्यक ती काळजी घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.