जागतिक अनिश्चिततेवर मात करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक अनिश्चिततेवर मात करू
जागतिक अनिश्चिततेवर मात करू

जागतिक अनिश्चिततेवर मात करू

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चित असली, तरीही देशांतर्गत मागणी आणि सरकारच्या उपाययोजनामुळे आपण या परिस्थितीवरही मात करू, असा विश्वास अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील कंपनी लार्सन अँड टुब्रोतर्फे व्यक्त केला आहे.

नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही निकालांसोबत कंपनी व्यवस्थापनाने देशाच्या व जगाच्या आर्थिक स्थितीबाबत विवेचन केले आहे. केंद्र सरकारच्या सुधारणा आणि आर्थिक उपायोजनांमुळे गुंतवणूक आणि विकास या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे जागतिक आव्हानांवरही भारत मात करू शकेल, असेही त्यात म्हटले आहे.

यावर्षीचे करसंकलन चांगले असल्यामुळे सरकारला विकास योजनांवर खर्च करणे शक्य होईल. त्याचबरोबर जागतिक मंदीचे सावट असले, तरी देशांतर्गत मालाचा खप चांगला आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूकही येऊ शकते; तर युरोपातील युद्धजन्य स्थिती, त्यामुळे अन्नपुरवठा आणि ऊर्जापुरवठा विस्कळित झाल्याने येऊ शकणारी मंदी व चलनवाढ त्यामुळे तेथील मागणीही अनिश्चित राहील. त्याच वेळी आखाती देश तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्यामुळे त्याचे उत्पादनही वाढेल; तर काही देश तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी धातूनिर्मिती, स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधांचा विकास यावरही भर देत आहे. लार्सन टुब्रोचे प्रकल्प आणि उच्चतंत्रज्ञान उत्पादनांचा व्यवसाय, आखाती देशातील संधी साधण्यास सज्ज आहे; तर आयटी व्यवसायही जागतिक बाजारपेठेत आघाडी घेऊ शकेल. यामुळे जागतिक अनिश्चित परिस्थितीतही कंपनीवर चांगले परिणाम होतील, असाही विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला आहे.

अर्थव्यवस्था वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी
---------------
भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची वाढ कायम राहील; मात्र अपेक्षापेक्षा तिचा वेग कमी राहील. चलनवाढीमुळे तसेच अस्थिर जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे देशाच्या विकासावर किंचित परिणाम होऊ शकतो. युरोपातील युद्धजन्य परिस्थिती व जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी, यामुळे खासगी क्षेत्राची मोठी गुंतवणूक उशिराने होऊ शकते; तर दुसरीकडे अशा स्थितीत सरकारने अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अनेक उपाय योजले आहेत. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना अन्य क्षेत्रातही लागू केली जाईल. कामगार, दळणवळण, आरोग्य शिक्षण या क्षेत्रातील सुधारणांकडे सरकार लक्ष देत असून त्याचेही चांगले परिणाम दिसतील, असेही कंपनीने म्हटले आहे.