म्हाडाचे अध्यक्षपद भरण्याच्या हालचाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाचे अध्यक्षपद भरण्याच्या हालचाली
म्हाडाचे अध्यक्षपद भरण्याच्या हालचाली

म्हाडाचे अध्यक्षपद भरण्याच्या हालचाली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : म्हाडा प्राधिकरणावर अध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून यासाठी नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडू लागल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठीची ही तयारी असून मतदारांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले आहे. त्यामुळे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेची ही निवडणूक तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे, कल्याण -डोंबिवली या भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. तसेच एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेले मेट्रो, एमटीएचएल प्रकल्प आणि इतर उन्नत मार्गांचे प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी वॉररूम तयार करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी दर आठवड्याला प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेत असून प्रकल्पात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासोबतच सरकारने गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; तर बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्याबाबत सतत आढावा बैठका सुरू आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ आणि कोकण मंडळामार्फत प्रकल्प राबवण्यास प्राधान्य देण्यासाठी म्हाडा अध्यक्षांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांनी एसआरए, म्हाडातील रखडलेल्या गृहनिर्माण योजनांचा आढावा घेऊन त्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.
-----------------------
म्हाडा अध्यक्षपद भाजपकडे
भाजप आणि शिंदे गटाने विविध महामंडळांवर दावा केला आहे. सेना- भाजप युतीमध्ये आजवर म्हाडा अध्यक्षपद शिवसेनेकडे होते; तर सिडको भाजपकडे होते. मात्र मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने मुंबईवर लक्ष्य केंद्रित केले आहे. मुंबईतील म्हाडा वसाहती, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी भाजपाने म्हाडा अध्यक्षपद आपल्याकडे मागितले आहे; तर सिडको शिंदे गटाला देण्यावर जवळपास निश्चिती झाली असल्याचे समजते.