सरकारी कर्मचाऱ्याने जबानी फिरवल्यास गुन्हा नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारी कर्मचाऱ्याने जबानी फिरवल्यास गुन्हा नाही!
सरकारी कर्मचाऱ्याने जबानी फिरवल्यास गुन्हा नाही!

सरकारी कर्मचाऱ्याने जबानी फिरवल्यास गुन्हा नाही!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : सरकारी कर्मचाऱ्यांनी एखाद्या फौजदारी खटल्यात जबानी फिरवली तरी तो शिक्षेस पात्र होणारा गुन्हा ठरू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात आलेल्या एका अपील याचिकेवर न्या. मंगेश पाटील आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने निकालपत्र दिले आहे. साक्ष फिरवण्याची कारणे आणि त्यातील वैधता याचा निर्णय न्यायालय पातळीवर होत असतो, असेदेखील यामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे जी समिती यामध्ये नियुक्त असेल ती तज्ज्ञ व्यक्तींची हवी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

नांदेड तहसीलदार कार्यालयात काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्याची जबानी सत्र न्यायालयात फिरवली. यामध्ये अटक आरोपीची सुटका झाली. त्याच्या फितुर होण्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध गैरवर्तनाची कारवाई सुरू केली. यामध्ये त्याला दोषी ठरवून त्याच्या वेतनात कपात करण्यात आली. याविरोधात त्याने आयोगाकडे अर्ज दाखल केला; मात्र त्याचा अर्ज नामंजूर झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आरोपीला दोषी ठरवण्यासाठी सत्र न्यायालयात निर्णय होणे आवश्यक आहे, तसेच केवळ एका कर्मचाऱ्याने दिलेल्या साक्षीमुळे आरोपी सुटला नसून, अन्य कारणेही यामध्ये असतात. त्यामुळे याचिकादार कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.

न्यायालयाचा निर्णय
एखाद्या खटल्यात साक्ष देताना जर महानगर दंडाधिकाऱ्यापुढे दिलेल्या जबानीवर सरकारी कर्मचारी कायम राहू शकला नाही आणि त्याने आपली जबानी फिरवली तर त्याची कृती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याची नैतिक दृष्टीने अयोग्य आणि अनपेक्षित वर्तन ठरू शकते; मात्र यामुळे त्याच्यावर शिक्षेची कारवाई होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच साक्षीदार म्हणून त्याची निवड करणाऱ्या संबंधित समितीला आरोपीच्या दोषीत्वावरून सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.