रायगडमध्ये खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद
रायगडमध्ये खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद

रायगडमध्ये खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : रायगड जिल्ह्यातील प्रमुख खाड्यांमध्ये असलेल्या खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. खारफुटीच्या प्रजातींमध्ये काही दुर्मिळ प्रजातींचा समावेशदेखील आहे. मँग्रोव्हज सेलने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाला (टीसी कॉलेज) रायगड जिल्ह्यातील प्रमुख खाड्यांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते.

सर्वेक्षण करण्यासाठी तसेच विविध खारफुटीच्या प्रजातींचे अस्तित्व आणि प्रसार समजून घेण्यासाठी संशोधन प्रकल्पही मंजूर केला होता. उरण खाडी, कारंजा खाडी, धरमतर खाडी, अलिबाग खाडी, राजापुरी खाडी, दिवेआगर खाडी, कुंडलिका खाडी आणि सावित्री खाडी आदी ठिकाणांचे यात सर्वेक्षण करण्यात आले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातर्फे सौरभ चंदनकर, गणेश पवार आणि डॉ. अजित टेळवे यांच्या पथकाने हे सर्वेक्षण केले.

महाविद्यालयाच्या संशोधकांनी २०२० च्या मध्यात सर्वेक्षणाचे काम सुरू केले; परंतु कोरोना टाळेबंदीमुळे हा प्रकल्प मे २०२२ मध्ये पूर्ण झाला. सर्वेक्षणादरम्यान खारफुटीच्या १५ प्रजातींची नोंद करण्यात आली. रेवदंडा आणि आगरदांडा येथे खारफुटीच्या सर्वाधिक प्रजाती (११) आढळल्या, त्यानंतर कुरूळ, भालगाव आणि वाशी-हवेली येथे खारफुटीच्या १० प्रजाती आढळून आल्या.

प्रजातींचा शोध
सर्वेक्षणादरम्यान नोंदवलेल्या सामान्य प्रजातींमध्ये एविसेनिया मरिना, एगीसीरस कोर्निक्यूलैतम, सोनेरेटा एपिटेला या प्रजातींची नोंद झाली. याव्यतिरिक्त ब्रुगुएरा सिलेंडरिका, ब्रुगुएरा जिम्नोरिझा, झायलोकार्पस ग्रॅनॅटम, सायनोमेट्रा इरिपा या महत्त्वाच्या दुर्मिळ खारफुटीच्या प्रजातींची काही भागात नोंद करण्यात आली.


रायगड जिल्ह्यातील खारफुटीची विविधता आणि दुर्मिळ प्रजाती असलेल्या काही क्षेत्रांची माहिती मिळाली आहे. खारफुटीच्या काही भागांमधील मानवनिर्मित हस्तक्षेपांवरही अहवालातून प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच खारफुटीच्या लागवडीची संभाव्य ठिकाणे देखील दर्शवली आहेत, ज्यांची वन विभागाकडून पडताळणी केली जाईल.
- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष