दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक
दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक

दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ ः भारत व अमेरिकेच्या चलनवाढीच्या तपशिलाकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी आज (ता. ९) सावधगिरीची भूमिका घेतल्याने सेन्सेक्स व निफ्टीमधील दोन दिवसांच्या तेजीला खीळ बसली. सेन्सेक्स १५१.६० अंश; तर निफ्टी ४५.८० अंश म्हणजे सुमारे पाव टक्का घसरला.

आज व्यवहार सुरू होताना जागतिक शेअर बाजार संमिश्र कल दाखवत होते. तरीही सेन्सेक्स व निफ्टीने सुरुवात नफ्यात केली, पण नंतर युरोपीय व आशियाई शेअरबाजार तोटा दाखवू लागल्याने भारतातही गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. तोट्यात गेलेले निर्देशांक दुपारनंतर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची खरेदी झाल्याने काहीसे सावरले. दिवसअखेर सेन्सेक्स ६१,०३३.५५ अंशांवर; तर निफ्टी १८,१५७ अंशांवर स्थिरावला.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांच्या निकालाकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे, पण भारतात बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आल्याने तसेच डॉलर इंडेक्स स्थिर राहणे व परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे आज भारतीय निर्देशांकांनी फारसा तोटा दाखवला नाही. नायकाच्या आयपीओपूर्वी जास्त शेअर मिळालेले संस्थात्मक गुंतवणूकदार व बड्या गुंतवणूकदारांना गुरुवारपासून आपले शेअर विकण्याची परवानगी मिळणार असल्याने हा शेअरही सातत्याने घसरतो आहे; तर टाटा मोटरचा तोटा कमी झाल्याच्या वृत्ताचाही गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.
-------
शेअरचे चढ-उतार
आज आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, कोटक बँक, एचसीएल टेक, इंडसइंड बँक या शेअरचे भाव अर्धा ते दोन टक्का वाढले; तर टेक महिंद्र, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र आणि महिंद्र, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, हिंदुस्थान युनिलीव्हर, नेस्ले, लार्सन ॲण्ड टुब्रो, मारुती या शेअरचे भाव पाऊण ते सव्वादोन टक्के घसरले.