‘आरे वाचवा’च्या आंदोलकाला हद्दपारची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरे वाचवा’च्या आंदोलकाला हद्दपारची नोटीस
‘आरे वाचवा’च्या आंदोलकाला हद्दपारची नोटीस

‘आरे वाचवा’च्या आंदोलकाला हद्दपारची नोटीस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्य सरकारने आरेमध्येच कारशेडचा प्रकल्प सुरू केला असला, तरी पर्यावरणवाद्यांची त्या विरोधातील भूमिका कायम आहे. त्‍यामुळे आरे आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्‍याचे दिसून येत आहे. ‘आरे वाचवा’ असा नारा देणारा आंदोलक तबरेज सय्यद याला पवई पोलिसांनी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून जास्तीत जास्त कालावधीसाठी हद्दपारची बुधवारी नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकारावर आरे आंदोलकांनी, पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ साठी आरेमध्ये कारशेड उभारली जात आहे. यासाठी झाडांची कत्तल करून कारशेड उभी केली जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आला. आरेमधील झाडांची कत्तल रोखण्यासाठी दर रविवारी आरे कॉलनीमध्ये आंदोलन केले जाते. या आंदोलनाला अनेक संघटना, नामांकित व्यक्ती आणि तरुणांनी पाठिंबा दिल्याने अधिक बळ मिळाले. मात्र, या मोहिमेतील मुख्य आंदोलकांना आरे पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात झाली; तर काहींवर गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये आरे आंदोलक तबरेज सय्यद याच्यामुळे पवई परिसरातील शांततेचा भंग होत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच, पवई पोलिस ठाणे परिसरातील रहिवासी, फेरीवाले, बांधकाम व्यावसायिक, दुकानदार यांच्यावर तबरेजने दहशत बसवली असल्याचा आरोप लावला आहे.
परिमंडळ दहाचे पोलिस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याद्वारे बुधवारी तबरेजला हद्दपारीची नोटीस जारी केली आहे; मात्र या संपूर्ण प्रकारावर पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. झाडांविषयीच्या आंदोलन करणाऱ्याला जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. या कारवाईच्या मागे सरकारची दंडेलशाही असल्याचा आरोप झोरू भाथेना यांनी दिली आहे.

आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत, गुन्हेगार नाहीत. आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही. आरे आंदोलनामध्ये माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यावरूनच आता मला तडीपारीची नोटीस काढली आहे. हे करतांना पोलिसांनी आम्हाला काळोखात ठेवले. कारवाईच्या माध्यमातून सरकार आम्हाला घाबरवत आहे. ईडी नाही म्हणून तडीपारीची कारवाई करत आहे; मात्र आम्ही घाबरणार नसून आमचे काम करत राहणार आहोत.
– तबरेज सय्यद, आंदोलक

तबरेजविषयी
तबरेज सय्यद हा तरुण उच्च शिक्षित असून इंटिरियर डिझायनर आहे. त्याची स्वतःची वेस्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. तो गेल्या ४ वर्षांपासून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया संघटनेशी संबंधित आहे. त्यातूनच तो आरे वाचवा आंदोलनामध्ये सहभागी झाला.