मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’
मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’

मुंबईत प्रदूषणाचा ‘रेड अलर्ट’

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबईतील हवेची गुणवत्ता आज पुन्हा एकदा ढासळली. मुंबईतील बहुतेक सर्वच नोडमधील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळल्याने माझगाव, मालाड, चेंबूर आणि नवी मुंबई परिसराचा ‘रेड झोन’मध्ये समावेश झाला आहे. परिणामी मुंबईकरांना सर्दी-खोकल्याच्या त्रासाचा सामना करावा लागत असून प्रदूषणाची समस्याही भेडसावत आहे.
माझगाव आणि मालाडमधील हवेची स्थिती सर्वाधिक खराब झाली आहे. तेथील हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ३२८ आणि ३०१ असा अतिशय वाईट नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल चेंबूर, बीकेसी, अंधेरी, कुलाबा आणि बोरिवलीतील हवेचा स्तरही खालावला आहे. हवाप्रदूषणाची पातळीही वाढली आहे. चेंबूर २४५, बीकेसी २३५, अंधेरी २२५, कुलाबा २५२ आणि बोरिवली २३२ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. येथील हवेचा स्तरही ‘वाईट’ नोंदवला गेला आहे. नवी मुंबईतही हवेची गुणवत्ता खालावली असून तिथे सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे. ३३६ हवा गुणवत्ता निर्देशांकासह तेथील हवेचा स्तर ‘अतिशय वाईट’ नोंदवला गेला आहे.
मुंबईतील वरळी आणि भांडुप परिसरातील प्रदूषण इतरांच्या तुलनेत काहीसे कमी दिसले. तिथे अनुक्रमे १०८ आणि ११८ हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा स्तर ‘मध्यम’ नोंदवला गेला; मात्र येथील हवेचा स्तर गेल्या आठवड्यापेक्षा अधिक खराब झाल्याचे दिसले.

सध्या वातावरणात ‘स्टॅगनंट कंडिशन’ आहे. त्यातच हवेमध्ये धुळीचे प्रमाण वाढले आहे. वेग मंदावल्याने हवेतील धूलिकण वाहून न जाता जागेवरच थांबले आहेत. परिणामी मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे दिसते. मात्र, काही दिवसांत स्थिती बदलेल.
- डॉ. गुफरान बेग, प्रकल्प संचालक, सफर

मुंबईत वाढलेल्या धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर निश्चितच होतो. धुळीचे अतिसूक्ष्म कण श्वसननलिकेत गेल्यास सर्दी-खोकल्यासह श्वसनासंबधीचे आजार होतात. डोळ्यांची जळजळही वाढू शकते. प्रदूषणाचा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो. दम्याचा त्रास असलेल्यांनी घराबाहेत पडणे किंवा धुळीमध्ये जाणे टाळावे. शक्यतो मास्क लावूनच घराबाहेर पडावे.
- डॉ. राजेंद्र ननावरे, छाती विकारतज्ज्ञ

परिसर हवा गुणवत्ता निर्देशांक स्तर
माझगाव २३८ अतिशय वाईट
मालाड ३०१ अतिशय वाईट
चेंबूर २४५ वाईट
बीकेसी २३५ वाईट
अंधेरी २२५ वाईट
बोरिवली २३२ वाईट
कुलाबा २११ वाईट
नवी मुंबई ३३६ अतिशय वाईट