राजावाडी रुग्णालयाकडून आम्हाला वाईट वागणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजावाडी रुग्णालयाकडून 
आम्हाला वाईट वागणूक
राजावाडी रुग्णालयाकडून आम्हाला वाईट वागणूक

राजावाडी रुग्णालयाकडून आम्हाला वाईट वागणूक

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : आम्ही गरीब माणसं आहोत, लहाणपणापासून इथेच राहतो. स्वतःच्या मर्जीने इथे राहत नाही. दोन वेळचे कमवून कसे खातो आणि आपल्या मुलांना कसे सांभाळतो, हे आमचे आम्हाला माहित, हे सांगताना गोवरमुळे मृत्यू झालेल्या दीड वर्षीय फझल खानची आई शाईन खानने राजावाडी रुग्णालयात मिळालेल्या वागणुकीचा निषेध केला.
गोवंडीच्या रफीनगर परिसरात काही दिवसांपूर्वी तीन लहानग्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ते तिघेही गोवरचे संशयित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. तीन मृतांपैकी फझल खानच्या आईने राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांवर ताशेरे ओढले. माझ्या मुलाला कुपोषणाचा त्रास नव्हता, त्याचे वजन १० किलो होते. ज्या वेळी आम्ही फझलला राजावाडी रुग्णालयात आणले, तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि काही तासांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्याची सूचना दिली, परंतु रुग्णालयात आयसीयूची सेवा नसल्याने व्हेंटिलेटरवर ठेवतो असे सांगितले गेले. फैझलच्या तोंडात नळी घालत असताना त्याचे दोन दात तुटले. शिवाय पायाची नस सापडत नसल्याने अनेक वेळा सुया टोचण्यात आल्या. आतापर्यंत मुलाचा एकही रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही. आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला एवढी वाईट वागणूक दिली. माझ्या मुलाला ज्या यातना झाल्या, त्या इतर मुलांना कधीही होऊ नयेत, अशीही इच्छा फैझलची आई शाईन खान यांनी व्यक्त केली. माझे पती मोहम्मद ईद खान वडाळ्यातील एका डिस्ट्रिब्युटर कंपनीत कामावर होते; पण फझलच्या आजारपणात सतत सुट्ट्या घेतल्याने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, असेही शाईन यांनी सांगितले.
---
पाणीही विकत आणण्याची वेळ!
रफीनगर हा झोपडपट्टी परिसर असून तेथे स्वच्छतेचा मोठा अभाव आहे. आठवड्यातून एकदा तरी येथील नाला साफ करण्यात यावा. प्रत्येक गल्लीत डासांसाठी धुराची फवारणी करावी. पाणी खरेदी करून प्यावे लागते. परिसरात पूर्ण दिवस वीज नसते. वीजमीटरसाठी १० ते १५ हजार रुपये लागतात; पण तेवढी कमाईच नसल्याने खाणार काय आणि इतर गोष्टींना पैसा कुठून आणाणार? पावसाळ्यात तर येथील रस्त्यावर चालणेही कठीण होते. स्थानिक रुग्णालयात कोणत्याही प्रकारची औषधे उपलब्ध होत नसल्याने ती बाहेरून आणावी लागतात, असेही शाईन यांनी या वेळी सांगितले.
---
सदर रुग्णाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. बालरोगतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार झाले आहेत. आमच्याकडे त्या रुग्णाचे सर्व अहवाल आहेत.
- डॉ. विद्या ठाकूर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय