संजय राऊत निकालातील ताशेरे ईडीसाठी बाधक ईडीचा हायकोर्टात युक्तिवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत निकालातील ताशेरे ईडीसाठी बाधक
ईडीचा हायकोर्टात युक्तिवाद
संजय राऊत निकालातील ताशेरे ईडीसाठी बाधक ईडीचा हायकोर्टात युक्तिवाद

संजय राऊत निकालातील ताशेरे ईडीसाठी बाधक ईडीचा हायकोर्टात युक्तिवाद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मंजूर झालेला जामीन रद्दबातल करण्यासाठी ईडीने केलेल्या याचिकेवर २५ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. विशेष न्यायालयाने ओढलेले ताशेरे ईडीच्या अन्य प्रकरणात बाधक ठरू शकतात, असे ईडीच्या वतीने सांगण्यात आले.

विशेष पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या १२२ पानी निकालपत्राला उच्च न्यायालयात ईडीने आव्हान दिले आहे. आरोपी प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचा या प्रकरणात महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळे जामीन रद्दबातल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्या. भारती डांग्रे यांच्या न्यायालयात आज याचिकेवर सुनावणी झाली. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी याचिकेत सुधारणा करण्यासाठी परवानगी मागितली. निकालपत्रात विशेष न्यायाधीशांनी ईडीच्या तपासकामावर ओढलेल्या ताशेऱ्यांवरही ईडीने आक्षेप घेतला आहे. जामिनाच्या निकालपत्रात असे अप्रस्तुत ताशेरे असता कामा नयेत, याचा विपरीत परिणाम अन्य प्रकरणात होऊ शकतो, असा युक्तिवाद सिंह यांनी केला.

याचिकेवर ता. २५ पासून नियमित सुनावणी होणार असून १४ नोव्हेंबरपर्यंत ईडीला सुधारित याचिका दाखल करायची आहे. प्रतिवादी पक्षांना त्यानंतर दोन आठवड्यात लेखी बाजू दाखल करायची आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. राऊत यांची अटकच अवैध आहे, असे विशेष न्यायालयाने म्हटले आहे आणि ईडीच्या एकूणच तपासकामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ईडीने मुख्य आरोपींना अद्याप अटक केली नाही आणि राऊत यांच्या कोठडीची मागणी करत आहेत, असे विशेष न्यायालयाने सुनावले आहे. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे आणि संजय राऊत त्याचे मुख्य सूत्रधार आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.