किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले
किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले

किहीम पक्षी निरीक्षण केंद्राचे काम रखडले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या स्मरणार्थ अलिबागमधील किहीम (जि. रायगड) येथे उभारण्यात येत असलेल्या पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राला राज्यातील सत्तांतराचा फटका बसल्याचे समोर आले आहे. डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनी म्हणजेच, १२ नोव्हेंबरला या अभ्यास केंद्राचे लोकार्पण नियोजित होते; परंतु नवीन सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना दिलेल्या स्थगितीचा फटका या केंद्राला बसला.

डॉ. सलीम अली यांनी किहीम येथे आयुष्यातील बराच काळ घालवला. पक्षी आणि त्यांच्या प्रजननाचा अभ्यास त्यांनी केला. तत्कालीन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी डॉ. सलीम अली यांच्या सन्मानार्थ वनविभाग अलिबागमध्ये पक्षी केंद्र सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यासाठी रायगड जिल्हा परिषद, वन विभाग यांच्या माध्यमातून पक्षी निरीक्षण व अभ्यास केंद्राचे काम सुरू करण्यात आले. ११ जानेवारी २०२२ ला आदिती तटकरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

किहीममधील १२० वर्ष जुन्या आणि गेल्या १० वर्षांपासून बंद असलेल्या ब्रिटिशकालीन शाळेच्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या शाळेची डागडुजी करून तसेच त्यात काही नवीन बांधकामे करून दोन टप्प्यात काम पूर्ण केले जाणार होते. पहिल्या टप्प्यात ५५ लाख तर दुसऱ्या टप्प्यात १.२ कोटी रुपयांचे काम केले जाणार होते. यातील पहिल्या टप्प्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे काम सरकारने दिलेल्या स्थगितीमुळे रखडले आहे. अर्धवट उभे असलेले बांधकाम जीर्ण झाले असून कोसळण्याच्या अवस्थेत आहे. सरकारने दिलेली स्थगिती उठून केंद्राचे काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे.

बीएनएचएसच्या मदतीने केंद्र
अलिबागमधील पक्षी केंद्र आणि पक्षी पर्यटन उपक्रमांसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) मदतीने अभ्यास केंद्र उभारले जात आहे. पद्मभूषण आणि पद्मविभूषण डॉ. सलीम अली यांनी पक्षी अभ्यास व पक्षी संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या नावाने त्यांच्याच किहीम गावी हे पक्षी अभ्यास केंद्र सरकार उभारत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव किशोर रिठे यांनी सांगितले.

डॉ. सलीम अली यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ किहीममध्ये व्यथित केला. तिथे त्यांनी पक्षी निरीक्षणाचे महत्त्वाचे काम केले. त्यांची आठवण म्हणून तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
- आदिती तटकरे, माजी मंत्री

अभ्यास केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला परवानगी मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. या कामाला राज्य सरकार परवानगी देईल, अशी अपेक्षा आहे.
- आशीष ठाकरे, उपवनसंरक्षक, अलिबाग