केंद्रीय पथकाकडून गोवंडीचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय पथकाकडून गोवंडीचा आढावा
केंद्रीय पथकाकडून गोवंडीचा आढावा

केंद्रीय पथकाकडून गोवंडीचा आढावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : मुंबईमध्ये झोपडपट्टी विभागात ‘मिसेल रुबेला’ म्हणजेच गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत १०९ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत ९ लाख १६ हजार ११९ घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्यात ६१७ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक रुग्ण गोवंडी विभागात आढळून येत असल्याने या विभागाला केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ३ सदस्यीय पथकाने आज भेट देऊन आढावा घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

एम पूर्व अर्थात गोवंडी विभागात सप्टेंबर आणि ऑक्टोबरपासून गोवर आजाराचा संसर्ग वाढला. या दोन महिन्यात ८४ रुग्णांची नोंद झाली आहे. गोवरचे रुग्ण वाढल्याने केंद्र सरकारने ३ सदस्यीय टीम मुंबईत पाठवली. त्यात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) नवी दिल्ली, लेडी हार्डिंज मेडिकल कॉलेज (एलएटएमसी) नवी दिल्ली आणि प्रादेशिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. या टीमचे नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव (उपसंचालक, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम) करत आहेत. या टीमने आज गोवंडी रफिक नगर विभागात जाऊन भेटी दिल्या. त्यानंतर हे पथक राजावाडी रुग्णालयात गेले. ज्या ठिकाणी ३ मुलांचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

सर्वाधिक रुग्ण
एम पूर्व गोवंडी विभागात एकूण ८० हजार ६०३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये १२१० मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले; तर मुंबईत ९ लाख १६ हजार ११९ घरांचे सर्व्हेक्षण झाले आहे. त्यात ६१७ संशयित गोवरचे रुग्ण आढळून आले. मुंबईत अतिरिक्त सत्रात ५६४८ मुलांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.