मेट्रो मार्गामुळे मैदानावर संक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो मार्गामुळे मैदानावर संक्रांत
मेट्रो मार्गामुळे मैदानावर संक्रांत

मेट्रो मार्गामुळे मैदानावर संक्रांत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : दहिसर-भाईंदर मेट्रो- ९ मार्गाच्या कारशेड उभारणीस मोर्वे, रायमुर्दे आणि मुर्दे या तीन गावांतील गावकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यामुळे हा मार्ग वादात सापडला असतानाच सुधारित मेट्रो रेल्वे आराखड्यानुसार हा मार्ग मुद्रे येथील ‘बांगलादेश’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुभाषचंद्र बोस मैदानातून जाणार आहे, परंतु या मार्गामुळे खेळाच्या मैदानावर संक्रांत येणार आहे. यामुळे लहान-मोठ्या मुलांच्या खेळण्यांसह नागरिकांच्या मॉर्निंग वॉकमध्येही अडथळा निर्माण होणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक गतिमान करण्यासाठी एमएमआरडीएमार्फत १४ मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे. मेट्रो बृहत आराखड्यानुसार अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो- ७ मार्गाचा पुढे विस्तार करण्यासाठी एमएमआरडीएने दहिसर-भाईंदर मेट्रो ९ मार्गाचे काम हाती घेतले आहे. या मार्गाला गती देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. या मार्गाचे कारशेड मिठागरांच्या जमिनीवर प्रस्तावित करण्यात आले होते; मात्र कारशेडसाठी आता मिरा-भाईंदर महापालिका हद्दीत प्रस्तावित करण्यात आले असून, मेट्रोच्या मार्गातही बदल केला आहे. सुधारित आराखड्यानुसार मेट्रो महापालिका हद्दीतील सुभाषचंद्र बोस मैदानातून जाणार आहे.

मिरा-भाईंदर शहर नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. महापालिका हद्दीत ६५ उद्याने आणि १२ क्रीडांगणे आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत शहरात मैदाने अपुरी असल्याने महापालिका हद्दीतील बहुतांश क्रिकेट, फुटबॉल आदी सामने याच मैदानावर आयोजित करण्यात येतात. सुटीच्या दिवशी तर या मैदानात ५०० ते ६०० तरुण क्रिकेटसह विविध खेळ खेळतात; मात्र याच मैदानातून मेट्रो मार्ग प्रस्तावित केल्याने खेळावर मर्यादा येणार आहे. परिणामी, महापालिका हद्दीतील नागरिकांकडून या कामाला विरोध होऊ लागला आहे. शहरामध्ये मैदाने शिल्लक राहिली नसल्याने अनेक रहिवासी सकाळ-सायंकाळी सुभाषचंद्र बोस मैदानात फेरफटका करण्यासाठी येतात; मात्र या मैदानावर संक्रांत आल्याने येथील नागरिक आणि तरुणांना खेळण्या-बागडण्यासाठी मैदान उरणार नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.
---------

मुंद्रे गावातील सुभाषचंद्र बोस मैदानात आम्ही क्रिकेट, फुटबॉल खेळतो. गावातील मुलांसह महापालिका हद्दीतील मुले येथे खेळण्यासाठी येतात. मोठमोठे क्रिकेट, फुटबॉलचे सामने याच मैदानात होतात. या मैदानातून मेट्रो गेल्यास आम्हा मुलांचे खेळणे बंद होईल. त्यामुळे आम्हाला मेट्रो प्रकल्प नको.
- पार्थ भोईर, खेळाडू

सुभाषचंद्र बोस मैदान खूप जुने खेळाचे मैदान आहे. आम्ही लहानपणापासून या मैदानात खेळलो आहोत. आता शहरात मैदाने शिल्लक राहिली नसल्याने पालिका हद्दीतील अनेक मुले खेळण्यासाठी या मैदानावर येतात. ज्येष्ठ नागरिक येथे सकाळ-सायंकाळी फिरण्यासाठी येतात. या मैदानातून मेट्रो जाणार हे समजल्यापासून वाईट वाटत आहे. आम्ही रहिवासी मेट्रोला विरोध करणार आहोत.
- विजेंद्र गोमेस, रहिवासी

मेट्रो मार्ग आता सर्वांत मोठ्या खेळाच्या मैदानातून जाणार आहे. मेट्रो मैदानातून गेल्यास भविष्यात खेळाचे मैदान निरुपयोगी ठरणार आहे. त्यामुळे शहरातील तरुणांचे क्रीडा उपक्रम हिरावून घेतले जाणार आहेत. यासाठी एमएमआरडीएने मेट्रोच्या मार्गात बदल करावा.
- गॉडफ्रे पेमेंटा, बॉम्बे ईस्ट इंडियन असोसिएशन