अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मराठी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मराठी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मराठी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मराठी पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : तंत्रशिक्षण मातृभाषेतून मिळाले तर विद्यार्थ्यांना विषय लवकर समजेल, नवीन कल्पकता सुचेल आणि संशोधनाकडे वाटचाल करणे अधिक सुलभ होईल. त्‍यामुळे विविध शोधांचे ते पेटंट मिळवू शकतील आणि मातृभाषेतील ज्ञानामुळे आत्मविश्वाससुद्धा वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनी निर्मित केलेल्या पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा संपन्न झाला, त्‍या वेळी पाटील बोलत होते.
मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते पदविका व पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करण्यात आले. या वेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार, नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडीटेशन नवी दिल्ली अध्यक्ष प्रा. के. के. अग्रवाल, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली उपाध्यक्ष प्रा. एम. पी. पुनिया, तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्रातील प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

२० पुस्‍तकांची निर्मिती
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे बारा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याचा एआयसीटीईने स्वागतार्ह निर्णय घेतलेला आहे. मराठी भाषेमधील प्रथम वर्षाची अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची ९ व पदविका अभ्यासक्रमांची ११ अशा एकूण २० पुस्तकांची निर्मिती एआयसीटीईकडून करण्यात आलेली आहे.

तंत्रशिक्षण मातृभाषेतून मिळाले तर विद्यार्थ्यांना विषय लवकर समजेल, नवीन कल्पकता सुचेल आणि ते संशोधनाकडे वाटचाल करतील. पेटंट मिळवतील आणि मातृभाषेतील ज्ञानामुळे आत्मविश्वाससुद्धा वाढण्यास मदत होईल. नवीन शिक्षण धोरणामध्ये भाषांमध्ये शिकण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषेत शिकविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धोरण विकसित करणे आवश्यक आहे.
- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

महाराष्ट्र राज्य समृद्ध आणि सुसंस्कृत वारसा लाभलेले अग्रेसर राज्य आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे मराठी भाषेत पुस्तक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी नक्कीच मदत होईल.
- डॉ. सुभाष सरकार, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री