अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ :  राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज आझाद मैदानावर निदर्शने केली. महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी निदर्शकांच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा केली. मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाईल, अशी ग्वाही लोढा यांनी आझाद मैदानावर येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली.

अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळात एम. ए. पाटील, शुभा शमीम, भगवानराव देशमुख, निशा शिवुरकर, माधुरी क्षीरसागर, जीवन सुरुडे, सरिता कंदले इत्यादींचा समावेश होता. मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधन भत्ता, प्रवास भत्ता, सेवा समाप्ती लाभ आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. थकित रकमा देणे, खासगीकरण रोखणे, ग्रॅच्युईटी लागू करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

अधिवेशनावर धडक
कृती समितीने सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी शासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत मानधनवाढीचा आदेश न निघाल्यास नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिवेशनात सर्व प्रश्नांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय न झाल्यास संपावर जाण्याची तयारी करण्याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.