पालिका इमारतींमधील किचनमध्ये फायर यंत्रणा हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका इमारतींमधील किचनमध्ये फायर यंत्रणा हवी
पालिका इमारतींमधील किचनमध्ये फायर यंत्रणा हवी

पालिका इमारतींमधील किचनमध्ये फायर यंत्रणा हवी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिकेची मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी रुग्णालये असून ती कंत्राट पद्धतीने सुरू आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर होत असूनदेखील अनेक कंत्राटदार त्यासाठी आवश्यक ‘फायर एनओसी’ घेत नसल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे. या ठिकाणी फायर यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
विनोद मिश्रा यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, पालिका कर्मचारी व इतर लोकांसाठी स्वयंपाकगृह कंत्राट पद्धतीने चालवीत आहोत. आपल्याच महापलिकेच्या विभागात स्वयंपाक घर चालवत असताना आपण सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वयंपाकगृहामध्ये मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर करण्यात येतो. त्यामुळे आग लागण्याची जास्त शक्यता असते. याबाबत अधिकारीवर्गाला विचारणा केली असता. ते कंत्राटदाराकडे बोट दाखवून मोकळे होत असून ते भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही.
महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी, इतर महत्त्वाचे दस्तावेज असतात. अशा वेळी स्वयंपाकगृहात जर आग लागली, तर ती इतरत्र पसरण्यास वेळ लागणार नाही, यासाठी आपल्या महानगरपालिकेला स्वयंपाकगृह कंत्राटदारावर अवलंबून चालणार नाही. ही भविष्यातील हानी टाळण्यासाठी महापालिकेची जबाबदारी आहे, यासाठी योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे, असेही मिश्रा यांनी म्हटले आहे.

ऑटोमॅटिक फायर यंत्रणा बसवावी
सायन रुग्णालयातील ४ स्वयंपाकगृहात विद्युत व यांत्रिकी विभागाकडून ऑटोमॅटिक फायर यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा ऑटोमॅटिक असल्याने त्यात आग लागली, तर जागेवरच विझवण्याची व्यवस्था आहे. ही चांगली व्यवस्था असून महानगरपालिकेच्या विभागांमध्ये आणि दवाखान्यांमध्येदेखील ही यंत्रणा बसविण्यासाठी यांत्रिकी व विद्युत विभागामार्फत निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती मिश्रा यांनी आयुक्तांकडे केली आहे.