स्वतःच्या जबाबदारीवर बेबी पावडरचे उत्पादन करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वतःच्या जबाबदारीवर
बेबी पावडरचे उत्पादन करा!
स्वतःच्या जबाबदारीवर बेबी पावडरचे उत्पादन करा!

स्वतःच्या जबाबदारीवर बेबी पावडरचे उत्पादन करा!

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : वादात सापडलेल्या जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीला बेबी पावडरचे उत्पादन स्वतःच्या जबाबदारीवर करण्याची परवानगी आज मुंबई उच्च न्यायालयाने दिली; मात्र पावडरच्या विक्रीवर असलेली बंदी तूर्तास कायम ठेवली आहे.
जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या मुलुंड येथील प्रकल्पात बेबी पावडरच्या उत्पादनाची पुन्हा नव्याने तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला दिली आहेत. सेंट्रल ड्रग टेस्टिंग लेबोरेटरी, एफडीए प्रयोगशाळा, बीकेसी आणि इन्ट्राटेक प्रयोगशाळा या तीन प्रयोगशाळांत उत्पादनाची चाचणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा राज्यातील परवाना रद्दबातल करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला कंपनीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. यावर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
संबंधित परवाना डिसेंबर २०२२ पासून रद्द करण्यात येणार आहे, असे परवाना विभागाकडून १५ सप्टेंबरला नोटिशीद्वारे कळवण्यात आले होते; मात्र त्यानंतर पाच दिवसांत उत्पादन बंद करण्याचे आणि परवाना रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे याचिकेत म्हटले आहे. न्यायालयाने आज कंपनीला उत्पादन स्वतःच्या जबाबदारीवर सुरू करण्याची परवानगी खंडपीठाने दिली. तसेच प्रशासनाचा, उत्पादन विक्रीला आणि वितरणाला असलेला मनाई आदेश तूर्तास कायम ठेवला.
---
तीन प्रयोगशाळांत चाचणी
नव्याने तीन प्रयोगशाळांत बेबी पावडर नमुन्याची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या तीन दिवसांत प्रशासनाने आणि कंपनीच्या प्रतिनिधींसह नमुना उत्पादन घेऊन प्रयोगशाळेत द्यावे आणि प्रयोगशाळेने त्यानंतर तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अहवालात काही संभ्रम असू नये म्हणून दोनतीन प्रयोगशाळांत चाचणी घेण्यात येणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.