मुंबई महानगर प्रदेशातील घरांची विक्री होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महानगर प्रदेशातील घरांची विक्री होईना
मुंबई महानगर प्रदेशातील घरांची विक्री होईना

मुंबई महानगर प्रदेशातील घरांची विक्री होईना

sakal_logo
By

दहिसर आणि पनवेलमधील घरे महागली
एमएमआर क्षेत्रातील ३७ टक्के सदनिका विक्रीविना पडून

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : वाढती मागणी आणि आघाडीच्या विकसकांनी जाहीर केलेल्या प्रकल्पांमुळे भारतातील प्रमुख आठ शहरांतील घरांच्या किमती ६ टक्क्यांनी वाढल्या आहेत; मात्र मुंबई महानगर प्रदेशात नवीन प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने सलग पाचव्या तिमाहीत विक्री होत नसलेल्या घरांची संख्याही वाढलेली दिसत आहे. पश्चिम मुंबईतील दहिसरपुढील भागात घरांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के एवढी सर्वोच्च वाढ झाली आहे. त्या खालोखाल पनवेलमधील घरांचे दर मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची वाढ २१ टक्के आहे. एमएमआर क्षेत्रातील ३७ टक्के घरे विक्रीविना पडून आहेत.

विकसकांच्या क्रेडाई संघटनेने ‘कोलिअर्स- लायसेस फोरास’ संस्थांसोबत हाऊसिंग प्राईस ट्रॅकर अहवाल २०२२ जाहीर केला आहे. देशातील प्रमुख आठ शहरांतील घरांच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. आठ शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, एमएमआर, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बेंगळूरु आणि अहमदाबाद शहरांचा समावेश आहे. मागील वर्षाच्या एप्रिलपासून घरांच्या मागणीत वाढ झाल्याने आणि कच्चा माल महागल्याने २०२२ सालच्या सुरुवातीपासूनच घरांच्या किमती वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये निवासी जागांच्या किमतीत सर्वोच्च म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत १४ टक्के वाढीची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ कोलकाता व अहमदाबादममध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे १२ व ११ टक्के वाढ झाली. विक्री न झालेल्या घरांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्के वाढ झाली आहे.
गेल्या काही तिमाहींमध्ये नवीन प्रकल्प नसल्याने भारतातील विक्री न झालेल्या निर्माणाधीन घरांचे प्रमाण सुमारे ९४ टक्के आहे. हैदराबाद, एमएमआर व अहमदाबाद शहरांमध्ये विक्रीविना पडून असलेल्या घरांमध्ये वाढ दिसून आली आहे. त्याचे कारण नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांची लक्षणीय संख्या आहे. विक्री न झालेल्या घरांमध्ये एमएमआरचा वाटा सर्वाधिक म्हणजेच ३७ टक्के आहे. त्याखालोखाल दिल्ली-एनसीआर व पुण्याचा वाटा प्रत्येकी १३ टक्के आहे.
एमएमआरमध्ये नवीन प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे सलग पाचव्या तिमाहीत विक्री होत नसलेल्या घरांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २१ टक्के वाढ झाली आहे. घरांच्या किमतीत एक टक्का एवढी किंचित घट झाली आहे; मात्र पश्चिम उपनगरांमधील दहिसरपलीकडील घरांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्के सर्वोच्च वाढ झाली आहे. त्याखालोखाल पनवेलमधील घरांच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्के वाढल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे भाड्याने राहण्‍याऐवजी स्‍वत:चे घर असण्‍याचे महत्त्व ग्राहकांमध्ये प्रकर्षाने जाणवू लागले आहे. वर्षअखेरपर्यंत सणासुदीचा काळ सुरू राहण्‍याची आशा असल्‍यामुळे घरांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. विकल्या न गेलेल्या सदनिकांची यादी कमी होण्‍याचीही अपेक्षा आहे.
- हर्षवर्धन पतोडिया, अध्‍यक्ष, क्रेडाई नॅशनल