सव्वालाख रोजगारांसाठी औद्योगिक संस्थांशी करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वालाख रोजगारांसाठी औद्योगिक संस्थांशी करार
सव्वालाख रोजगारांसाठी औद्योगिक संस्थांशी करार

सव्वालाख रोजगारांसाठी औद्योगिक संस्थांशी करार

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ ः राज्यात सव्वा लाख युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नामांकित उद्योजक, औद्योगिक संघटना व नोकरी देणाऱ्या संस्था यांच्याबरोबर राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाने सामंजस्य करार केले.

राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार झाले. राज्याच्या समतोल विकासासाठी ग्रामीण भागातील युवकांनादेखील औद्योगिक प्रशिक्षण देऊन उद्योजक बनवले पाहिजे, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले. यापुढे राज्यातून कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, असा शासनाचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी केले; तर राज्य शासनाने शासकीय नोकऱ्यांमध्ये पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात मोठ्या संख्येने रोजगार देऊ शकत नाही. म्हणून कौशल्य विकासाच्या माध्यमातून उत्पादन व सेवा क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.

जागतिक स्तरावर नोकरकपात होत असताना राज्यात सव्वा लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत, हे उल्लेखनीय यश आहे. पुढील वर्षात राज्यातील १००० गावांमध्ये कौशल्य केंद्र उघडून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती केली जाईल, असे लोढा यांनी सांगितले. या वेळी ४५ संस्थांशी करार करण्यात आले. यातून आदरातिथ्य उद्योग, मीडिया व मनोरंजन, पायाभूत सुविधा, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन आदी क्षेत्रांत रोजगार मिळतील. बीव्हीजी इंडिया, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ अॅग्रीकल्चर ॲण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आदी संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.