ठाकरेंच्या मालमत्तेसंबंधी २२ नोव्हेंबरला सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरेंच्या मालमत्तेसंबंधी २२ नोव्हेंबरला सुनावणी
ठाकरेंच्या मालमत्तेसंबंधी २२ नोव्हेंबरला सुनावणी

ठाकरेंच्या मालमत्तेसंबंधी २२ नोव्हेंबरला सुनावणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १७ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर २२ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. भिडे यांनी याचिकेवर उपस्थित केलेले आक्षेप अद्याप दूर केलेले नाहीत, अशी तक्रार ठाकरे यांच्या वकिलांनी आज पुन्हा न्यायालयात केली.

याचिका स्वीकारण्यास कुणीही वकील तयार नसल्यामुळे गौरी भिडे स्वत:च युक्तिवादासाठी उभ्या राहिल्या आहेत; मात्र त्यासाठी त्यांनी आपण स्वत: युक्तिवाद करण्यास सक्षम आहोत, आपला याचिकेमागे कोणताही स्वार्थ नाही. तसेच आपल्यावर कोणताही फौजदारी गुन्हा नाही आदी तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करणे आवश्यक आहे. याबाबत याचिकाकर्त्यांनी रजिस्ट्रारला भेटून खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आणि सुनावणी २२ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. ठाकरे कुटुंबाचे उत्पन्न आणि त्यांची संपत्ती यामध्ये समतोल लागत नसल्याने या प्रकरणाची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. भिडे यांची दादरमध्ये प्रकाशन संस्था आहे.