दुहेरी हत्याकांडप्रकरणी छोटा राजनसह चौघे निर्दोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुहेरी हत्याकांडप्रकरणी
छोटा राजनसह चौघे निर्दोष
दुहेरी हत्याकांडप्रकरणी छोटा राजनसह चौघे निर्दोष

दुहेरी हत्याकांडप्रकरणी छोटा राजनसह चौघे निर्दोष

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : सुमारे १३ वर्षांपूर्वीच्या जे. जे. सिग्नल दुहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने आज गँगस्टर छोटा राजनसह चार जणांची निर्दोष सुटका केली. अभियोग पक्ष सबळ पुरावे दाखल करू शकला नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनमधील टोळी युद्धातून भेंडीबाजारच्या जे. जे. सिग्नलवर दुहेरी हत्याकांड घडल्याचा आरोप जे. जे. रोड पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता; मात्र पोलिस या प्रकरणात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे दाखल करू शकले नाहीत, असे निरीक्षण विशेष न्या. ए. एम. पाटील यांनी नोंदवले. आरोपींना साक्षीदारांकडून ओळखण्यात आलेले अपयश, तब्बल दीड वर्षांनंतर केलेली ओळख परेड, हत्याकांडामध्ये वापरलेल्या पिस्तूल आणि काडतुसांचा ताळमेळ न लागणे, तपासातील विसंगती आदी बाबी विशेष न्यायालयाने नमूद केल्या आहेत. तपासातील पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यात अपयशी ठरत आहेत, असे स्पष्टपणे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून या आरोपांसाठी कारागृहात असलेल्या आरोपींची सुटका झाली आहे. यामध्ये राजनसह मोहम्मद अली जान, प्रणय राणे, उमेद यांचा समावेश आहे.
---
काय घडलं होतं?
अभियोग पक्षाच्या दाव्यानुसार, दाऊद आणि गँगस्टर छोटा शकीलचे निकटवर्तीय असलेले आसिफ दाढी ऊर्फ छोटे मिया आणि शकील मोदक जे. जे. सिग्नलवर त्यांचा साथीदार आसिफ खानला भेटायला येणार होते. २९ जुलै २००९ मध्ये सिग्नलवर आलेल्या मिया आणि मोदकवर आरोपींनी गोळीबार केला. यामध्ये आसिफसह आणखी तीन जण जखमी झाले; तर मिया आणि मोडक यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी यामध्ये राजनच्या साथीदारांना अटक केली. राजन सध्या नवी दिल्लीत तिहार कारागृहात आहे. त्याच्याविरुद्ध अद्यापही पंचवीसहून अधिक खंडणी आणि हत्येचे खटले प्रलंबित आहेत.