आयुक्त चहल यांच्याविरोधातील समन्सच्या कारवाईला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त चहल यांच्याविरोधातील समन्सच्या कारवाईला स्थगिती
आयुक्त चहल यांच्याविरोधातील समन्सच्या कारवाईला स्थगिती

आयुक्त चहल यांच्याविरोधातील समन्सच्या कारवाईला स्थगिती

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : कोविड संसर्ग कालावधीत लावलेल्या निर्बंधाबाबत केलेल्या तक्रारींवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याविरोधात जारी केलेल्या मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाच्या समन्सच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली.
मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल, माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड निर्बंधांमध्ये लस घेतलेले नागरिक आणि लस न घेतलेले नागरिक यामध्ये भेदभाव करण्यात आला. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे या तक्रारीत म्हटले आहे. दंडाधिकारी न्यायालयाने याची दखल घेतली असून तिन्ही अधिकाऱ्यांना पुढील वर्षी जानेवारीच्या ११ तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.
चहल यांनी ॲड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत या समन्सला उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने चहल यांच्या समन्सला स्थगित दिली आहे. महापालिका आयुक्त चहल यांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा केल्याचे आढळत नाही, असे निरीक्षण न्या अमीत बोरकर यांनी नोंदविले आहे. तसेच जाणीवपूर्वक कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्याचे किंवा कोणाला हानी पोहचविल्याचे देखील आढळत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
...
मूलभूत अधिकारांवर आक्रमण
तक्रारदार अंबर कोईरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, जर लस घेतलेल्या नागरिकांनादेखील कोरोनाचा धोका असतो, तर लस न घेणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक प्रवास आणि अन्य बाबींपासून वंचित का ठेवले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आक्रमण झाले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.