Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या घरावर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kishori pednekar
किशोरी पेडणेकरांच्या घरावर होणार कारवाई

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांच्या घरावर होणार कारवाई

मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए इमारत क्रमांक २ मधील ६०१ क्रमांकाचे घर अवैधरीत्या ताब्यात घेतल्याचे समोर आले. एसआरएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल एसआरएच्या सहनिबंधक सहकारी संस्था यांनी दिला आहे. त्यानुसार एसआरएने महापालिकेच्या सहायक आयुक्तांना संबंधित घर निष्कासित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात पेडणेकर यांच्या घरावर कारवाई होणार आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता नगर येथील एसआरए इमारतीमधील चार सदनिकांवर बेकायदा कब्जा केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

सदरची सदनिका एसआरएने गंगाराम बोगा यांना वितरित केली होती. या सदनिकेचा वापर बोगा यांनी करणे आवश्यक होते; मात्र त्यांनी ही सदनिका पेडणेकर यांना राहावयास दिल्याची माहिती पेडणेकर यांनी नामनिर्देशन पत्रासोबत मुंबई महापालिकेला दिल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बोगा यांनी एसआरएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा अहवाल सहकार विभागाने एसआरए अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यानुसार सक्षम प्राधिकारी यांना महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम १९७१ च्या कलम ३ (ई) अन्वये कारवाई करावी, असे एसआरएने पालिकेच्या जी दक्षिण विभागाला पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत निष्कासनाची कारवाई पुढील आठवड्यात होईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.