निर्देशांकांची सलग तिसरी घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांकांची सलग तिसरी घसरण
निर्देशांकांची सलग तिसरी घसरण

निर्देशांकांची सलग तिसरी घसरण

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ ः प्रतिकूल जागतिक परिस्थितीमुळे आज भारतीय शेअर बाजारातही विक्रीचे जोरदार पडसाद उमटून शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशीही घसरले. सेन्सेक्स ५१८.६४ अंश, तर निफ्टी १४७.७० अंश घसरला.

आज जागतिक शेअर बाजार तोट्यात असल्याने भारतीय शेअर बाजारही सकाळपासूनच घसरले होते. त्या घसरणीतून ते संध्याकाळपर्यंत सावरलेच नाहीत. केवळ सरकारी क्षेत्रातील बँका आणि धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर नफ्यात होते. ते वगळता आयटी, औषधनिर्मिती आणि वाहन उद्योग कंपन्यांचे शेअर घसरले. त्यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्स ६१,१४४.८४ अंशांवर, तर निफ्टी १८,१५९.९५ अंशावर स्थिरावला.

चीनमधील कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे तेथील विकासावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली; तर व्याजदरवाढीबाबत अमेरिकी फेडरल बँकेची भूमिका अजून स्पष्ट न झाल्यामुळे आज जागतिक स्तरावरही नफावसुली झाली. अशा स्थितीत कच्च्या तेलाचे भाव कोसळूनही त्याचे स्वागत शेअर बाजारांनी केले नाही. भारत सरकारने लोखंड आणि पोलादावरील निर्यात कर कमी केल्याने या कंपन्यांच्या काही शेअरचे भाव वाढले.

निफ्टीच्या प्रमुख पन्नासपैकी ३६ शेअरचे भाव आज कोसळले. तसेच सेन्सेक्समधील प्रमुख ३० पैकी २२ शेअरचे भाव पडले. आज एअरटेल, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर या सेन्सेक्समधील शेअरचे भाव पाऊण ते दोन टक्के वाढले; तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टीसीएस, टेक महिंद्र, इन्फोसिस, बजाज फायनान्स, विप्रो, डॉक्टर रेड्डीज लॅब, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व, आयटीसी, एचडीएफसी बँक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट यांचे भाव एक ते दोन टक्का पडले.