रुग्णांना १६१ रुपयांची थाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांना १६१ रुपयांची थाळी
रुग्णांना १६१ रुपयांची थाळी

रुग्णांना १६१ रुपयांची थाळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई उपनगरातील सात रुग्णालयांना थाळी पद्धतीने जेवण पुरवले जात असून पुरवठादाराचा अन्नपुरवठा करण्याचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे रुग्णांना अखंडित जेवण व नाष्ट्याचा पुरवठा होण्यासाठी तातडीने नवीन कंत्राटदार नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली. त्यातील १६१ रुपयांत थाळी देणारी निविदा असणाऱ्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. यासाठीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर रुग्णालयांमध्‍ये १६१ रुपयांना नाष्टा तसेच जेवणाचा पुरवठा सुरू होणार आहे.
मुंबईतील रुग्णालयांमधील रुग्णांना चांगले जेवण देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यात महापालिकेची १६ उपनगरीय रुग्णालय आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आता उपनगरीय रुग्णालय अत्याधुनिक करण्यावर भर देण्यात येत असून, रुग्णांना कपडे, जेवण, रुग्णांची तसेच रुग्णालयाची सुरक्षा, रुग्णालयाची निगा राखणे यासारख्या सुविधा वाढवण्यात येत आहेत.

या रुग्णालयांसाठी निविदा
उपनगरीय १६ रुग्णालयांपैकी सखा पाटील रुग्णालय मालाड, म. वा. देसाई रुग्णालय मालाड, हरीलाल भगवती रुग्णालय बोरिवली, क्रांतीचौथी सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली, माँ रुग्णालय चेंबूर, शताब्दी रुग्णालय गोवंडी, वि. दा. सावरकर रुग्णालय मुलुंड अशा सात रुग्णालयांत थाळी पद्धतीने पुरवठ्यामार्फत सकाळचा चहा, नाष्टा दुपार आणि रात्रीचे जेवण, संध्याकाळी चहा बिस्कीट देण्यात येते. मात्र चार डिसेंबर २०२१ पासून याचे कंत्राट संपलेले असल्याने ही सुविधा अखंड सुरू राहण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मे. अधिक रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रति रुग्ण १६१ रुपये (अन्य कंत्राटदारांपेक्षा कमी) किमतीने थाळी देऊ केल्याने त्यांना हे कंत्राट देण्यात आले. यासाठीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.