ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतची याचिका नवीन खंडपीठापुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतची याचिका नवीन खंडपीठापुढे
ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतची याचिका नवीन खंडपीठापुढे

ठाकरे यांच्या मालमत्तेबाबतची याचिका नवीन खंडपीठापुढे

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आणि त्यांच्या कुंटुंबीयांच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. नवीन खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दादरमधील रहिवासी गौरी भिडे आणि त्यांचे वडील अभय भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार होती; मात्र खंडपीठाने काही कारणास्तव सुनावणी घेण्यास नकार दिला आणि अन्य खंडपीठापुढे सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता दुसऱ्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.
ठाकरे कुंटुबीयांची मालमत्ता बेहिशेबी असून केवळ सामना आणि मार्मिक या प्रकाशन व्यवसायातून एवढी कोट्यवधीची मालमत्ता निर्माण होणार नाही, असा दावा याचिकेत केला आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या मालमत्तेची ईडी, सीबीआय या यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
...
स्वतः बाजू मांडणार
न्यायालयात भिडे स्वतः बाजू मांडणार आहेत. आज खंडपीठाने त्यांना, तुम्ही बाजू मांडण्यासाठी एखादा वकील देण्याबाबत विचारणा केली. यावर तुम्ही निर्णय घ्यावा, मात्र मी युक्तिवाद करू शकते, असा दावा गौरी यांनी केला. ठाकरे परिवाराच्या मालमत्तेचा ताळमेळ लागत नाही, याबाबत पुरावे असूनही ईडीमार्फत मनीलॉण्डरिंगचे आरोप होत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
...
ऑडिट झालेच नाही!
गौरी भिडे यांचा दादरमध्येच राजमुद्रा छापखाना होता. प्रकाशन व्यवसायात एवढा नफा मिळू शकत नाही. तसेच सामना वर्तमानपत्र आणि मार्मिकचे मागील काही वर्षे एबीसी ऑडिट झालेलेच नाही, असा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे.