उड्डाणपुलांवर केबल्सचा भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलांवर केबल्सचा भार
उड्डाणपुलांवर केबल्सचा भार

उड्डाणपुलांवर केबल्सचा भार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अवैध सेल्युलर टॉवर्स आणि केबल्समुळे उड्डाणपुलांवर अतिरिक्त भार पडत आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग कोसळला. त्यावरही अवैध सेल्युलर टॉवर्स आणि केबल्सच्या अतिभार असल्याचे नंतरच्या पाहणी अहवालात नमूद करण्यात आले होते. मुंबई शहरातील जवळपास सर्व फ्लायओव्हरवर सेल्युलर टॉवर्स बसवले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलांना धोका निर्माण झाला आहे.

दक्षिण मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल हे ब्रिटिशकालीन असल्याने जुने झाले आहेत. यातील काही उड्डाणपूल नव्याने बांधण्याचे काम सुरू आहेत; मात्र अनेक जुन्या उड्डाणपुलांवर मोबाईल कंपन्यांच्‍या सेल्युलर टॉवर आणि वेगवेगळ्या केबल वायरचा विळखा पडल्याचे दिसते. सेल्युलर टॉवरचा वापर हा परिसरातील मोबाईल रेंज उपलब्ध व्हावी, यासाठी केला जातो. शिवाय उड्डाणपुलांवर टीव्ही केबल, टेलिफोन, इंटरनेटच्या केबल वायरचा गुंताही मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसते.

सेल्युलर टॉवर्स आणि केबल्समुळे उड्डाणपुलावर अतिरिक्त भार पडत आहे. अंधेरीतील गोखले पुलाचा काही भाग जुलै २०१८ मध्ये कोसळला. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यूही झाला होता. यानंतर झालेल्या चौकशीमध्ये गोखले उड्डाणपूल कोसळण्याची समोर आलेल्या कारणांपैकी एक प्राथमिक कारण म्हणजे त्यावरील १२४ टन वजनाच्या केबल्स आणि पेव्हर ब्लॉक्स असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

मुख्‍यमंत्र्यांसह पालिका आयुक्‍तांकडे तक्रार
वॉचडॉग फाऊंडेशनने याप्रकरणी मुख्यमंत्री तसेच पालिका आयायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील मोबाईल ऑपरेटर्सनी मुंबई शहरातील जवळपास सर्व उड्डाणपुलांवर सेल्युलर टॉवर्स बसवले आहेत. या सेल्युलर टॉवर्सच्या केबल्स शहरातील सर्व उड्डाणपुलांवर लटकत असल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. या केबल्स केवळ उड्डाणपुलावरच वजन वाढवत नाहीत, तर त्याखालील वाहने आणि जाणाऱ्यांवरही पडू शकतात. पश्चिम द्रुतगती मार्गावरील सांताक्रूझ उड्डाणपुलावरील संरक्षण भिंतीवर असंख्य केबल्स नादुरुस्तपणे पडलेल्या दिसतात. तसेच अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पारशीवाडा जंक्शन उड्डाणपुलावरदेखील अशीच परिस्थिती आहे. अनेक केबल्स तुटून खाली पडल्या आहेत. रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या; पण त्याची दखल कुणी घेतलेली नाही, असे ही पिमेंटा म्हणाले.

उड्डाणपुलांवरील सेक्युलर टॉवर आणि केबल्समुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू शकतो. शहरातील सर्व उड्डाणपुलांची तातडीने तपासणी करण्याची गरज आहे. या केबल्सच्या बेजबाबदारपणामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्याची गरज आहे.
- गॉडफ्रे पिमेंटा, तक्रारदार, वॉचडॉग फाऊंडेशन

स्थानिक विभाग कार्यालयाकडून परस्पर परवानग्या दिल्या जातात. परवानग्या देतांना पूल विभागाला कळवले जात नाही. त्यामुळे उड्डाणपुलांवरील अवैध गोष्टींची नेमकी माहिती आम्हाला मिळत नाही. अशा तक्रारी आल्यास कारवाई करण्यासाठी विभाग कार्यालयांना कळवल्या जातील.
- संजय इंगळे, उपमुख्य अभियंता, पूल विभाग