कर्तव्यावर झोपणाऱ्या सीआयएसएफ जवानाला दिलासा नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्तव्यावर झोपणाऱ्या सीआयएसएफ जवानाला दिलासा नाहीच
कर्तव्यावर झोपणाऱ्या सीआयएसएफ जवानाला दिलासा नाहीच

कर्तव्यावर झोपणाऱ्या सीआयएसएफ जवानाला दिलासा नाहीच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : कर्तव्यावर असताना झोपणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाला मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणाच्या संरक्षणाची जबाबदारी जवानावर होती, असे खंडपीठाने नमूद केले आहे. नागपूरमधील मौदा थर्मल पॉवर प्लान्टवर सेवेत असलेल्या आर. किटले यांना मागील वर्षी मार्चमध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नागपूरमधील थर्मल पॉवरच्या एका टॉवरवर देखरेख करण्याचे काम किटले यांच्याकडे होते. रात्रीच्या वेळी सेवेत असताना ते झोपले होते, हे त्यांच्या वरिष्ठांनी पाहिले होते. तसेच यापूर्वी त्यांना अनेकदा ताकीदही देण्यात आली होती. ज्या कारणांमुळे मला बडतर्फ करण्यात आले, ते अवास्तव आहे. माझ्याकडून झालेली कृती आणि केलेली कारवाईमध्ये असमतोल आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता; मात्र मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठाने याबाबत असहमती व्यक्त केली. याचिकादाराचा बचाव अमान्य आहे. कारण कर्तव्यावर असताना झोप काढण्याचे काहीतरी संयुक्तिक कारण त्यांनी दिले नाही.

थर्मल पॉवर प्लान्टवर सुरक्षा रक्षक असताना रात्रीच्या वेळी गाढ झोपणे अनपेक्षित आहे. या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी सतर्क राहणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण खंडपीठाने व्यक्त केले. हा संपूर्णपणे सेवेत निष्काळजी केल्याचा प्रकार आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. यापूर्वीदेखील त्याला ताकीद देण्यात आली होती. म्हणजे असे वर्तन ते नेहमी करत असावेत, असे म्हणत न्यायालयाने त्यांची याचिका नामंजूर केली.