वालचंद हिराचंद यांना भारतरत्न द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालचंद हिराचंद यांना भारतरत्न द्या
वालचंद हिराचंद यांना भारतरत्न द्या

वालचंद हिराचंद यांना भारतरत्न द्या

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः भारताच्या औद्योगिकीकरणाचे आधारस्तंभ, प्रखर देशभक्त आणि स्वदेशी उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे त्यांच्या जयंतीदिनी करण्यात आली.
भारताच्या व महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचे जनक म्हणून गौरविण्यात येणारे, तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक वालचंद हिराचंद यांची १४० वी जयंती चेंबरच्या मुख्य कार्यालयात झाली. या वेळी वालचंद हिराचंद यांच्या परिवारातील सदस्य व चेंबरचे माजी अध्यक्ष अरविंदभाई दोशी, उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशीष पेडणेकर उपस्थित होते. या वेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही मागणी केली.
 स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश धोरणाविरुद्ध स्थानिक व्यापारी समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरची स्थापना शेठ वालचंद हिराचंद यांनी केली. वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीमुळे देशात उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनेक आर्थिक मुद्द्यांवर, प्रामुख्याने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतर्गत व बाह्य व्यापार व्यवसाय सुलभ करण्यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन शेठ वालचंद हिराचंद यांनी केल्याचे अध्यक्ष म्हणाले.
अरविंद दोशी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हे कार्य सतत सुरू ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य व्यापार, उद्योग क्षेत्रात प्रगतिपथावर जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र चेंबर बजावीत असल्याचेही ते म्हणाले.