उप-कुलसचिव, कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेत मोठा गैरप्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उप-कुलसचिव, कुलसचिवांच्या 
निवड प्रक्रियेत मोठा गैरप्रकार
उप-कुलसचिव, कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेत मोठा गैरप्रकार

उप-कुलसचिव, कुलसचिवांच्या निवड प्रक्रियेत मोठा गैरप्रकार

sakal_logo
By

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबई विद्यापीठातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेत सहायक कुलसचिव, उप-कुलसचिवांच्या नेमणुकीवेळी प्रत्येक टप्प्यावर गैरप्रकार झाल्याचा ठपका उच्च शिक्षण विभागाने ठेवला आहे. विद्यापीठाने सदर पदभरतीसाठी दिलेल्या जाहिरातीतच जाणीवपूर्वक उणीव ठेवत अनुभवाबाबतची प्रमाणसंहिताच धाब्यावर बसवली. परिणामी अनेक अपात्र उमेदवारांची नियुक्ती केल्याने पात्र उमेदवारांवर मात्र अन्याय झाल्याचे समोर आले. दरम्यान, अपात्र उमेदवारांच्या निवडीमुळे वेतन, भत्ते, सुविधांमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड पडल्याचे गंभीर आक्षेप उच्च शिक्षण विभागाने नोंदवले आहेत.
मुंबई विद्यापीठाने सहायक कुलसचिव, उप-कुलसचिवांच्या पदभरतीवेळी जाहिरातीत अनुभवाबाबतचा उल्लेखच टाळण्यात आला. आठ जणांकडे उप-कुलसचिव, सहायक कुलसचिव पदासाठी समकक्ष अनुभव नसतानाही त्यांची नियुक्ती केली, तर १२ जणांचे नियुक्तीपूर्वीचे अनुभव हे पूर्वीच्या पदावरील अनुभवाशी समकक्ष नसल्याचा सर्व प्रकार विद्यापीठाने गुपित ठेवला. पाच जणांची तात्पुरत्या आणि प्रभारी स्वरूपातील अनुभवाच्या आधारे नियुक्ती केली. शिवाय अनेक उमेदवारांनी नियुक्तीवेळी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्राबाबत उच्च शिक्षण विभागाला साशंकता आहे.
----
विद्यापीठातील बोगस पदभरती
१. खासगी कंपनीतील अनुभव
सध्या सहायक कुलसचिव असलेले अभिनंदन बोरगावे यांच्याकडे खासगी फार्मसी कंपनीत चार वर्षे कामाचा अनुभव होता. पुढे त्यांची वरिष्ठ लिपिकपदावर तात्पुरती नेमणूक, विक्रीकर निरीक्षक म्हणून दोन वर्षांचा अनुभव होता. सर्व अनुभव सहायक कुलसचिवपदाच्या समकक्ष नसल्याचे समोर आले. दुसरीकडे जयदत्त जाधव हे एका फार्मसी संस्थेत प्राध्यापक होते; परंतु त्यांच्या नियुक्तीला विद्यापीठाची मान्यताच नव्हती.
----
२. मुख्याध्यापकाच्या सहायक कुलसचिव
सहायक कुलसचिव असलेल्या सविता राऊत यांच्याकडे शालेय मुख्याध्यापकपदाचा अनुभव होता. हा अनुभवही सहायक कुलसचिवपदाशी समकक्ष नाही आणि त्या नियुक्तीस अपात्र असल्याचा गंभीर शेरा उच्च शिक्षण विभागाने अहवालात नमूद केला आहे.
--
३. लघुटंकलेखकाचा सहायक कुलसचिव
मैनुद्दिन शौकत अली शेख आणि संजना सावंत हे दोघेही सहायक कुलसचिव असून ते यापूर्वी लघु टंकलेखक आणि लघुलेखक होते. हा अनुभवही समकक्ष नसताना त्यांची सहायक कुलसचिवपदी नेमणूक झाली. अशोक घुले हे कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावरील जिल्हा प्रकल्प अधिकारी आणि समन्वयक म्हणून कार्यरत होते. तसेच वैशाली कांबळे या एका खासगी बांधकाम कंपनीत विधी अधिकारी होत्या. त्यांचीही सहायक कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा ठपका उच्च शिक्षण विभागाने नोंदवला.
--
४. अनुभवासाठी दिली सूट
सेक्शन ऑफिसर आणि ग्रेड पे चार हजार ४०० असताना विकास डवरे यांची सहायक कुलसचिवपदी नियुक्ती केली. तसेच रवींद्र साळवे यांची उप-कुलसचिव म्हणून नियुक्ती करताना विद्यापीठाने त्यांच्या अनुभवाच्या कालावधीत सवलत दिली. अशोक फर्डे यांची तर उप-कुलसचिवपदाच्या मुलाखतीवेळी त्यांच्या नियुक्तीला मान्यताच नव्हती. नरेंद्र खलाणे हे एका खासगी कंपनीत लेखा सहायक व लेखापाल असतानाही त्यांची सहायक कुलसचिव म्हणून नियुक्ती केली. या सर्व नियुक्त्या अपात्र असल्याचे उच्च शिक्षण विभागाने म्हटले आहे.
--
सर्व प्रक्रिया नियमानुसारच!
सहायक कुलसचिव व उप-कुलसचिव या पदांवरील नियुक्त्या या नियमानुसार पार पडल्या. सहायक कुलसचिवपदासाठी वर्ग-दोनचा, तर उप-कुलसचिव पदासाठी वर्ग-एक किंवा तत्सम पदाचा प्रशासकीय अनुभवानुसार ते पात्र झाले आहेत. तसेच निवड प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, छाननी समिती, निवड समिती गठित करून मुलाखती आयोजित करणे, या टप्प्यांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात आली. याबाबत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला.