बंधपत्रित सेवेतील डॉक्टरांना दिलासा मिळणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंधपत्रित सेवेतील डॉक्टरांना दिलासा मिळणार!
बंधपत्रित सेवेतील डॉक्टरांना दिलासा मिळणार!

बंधपत्रित सेवेतील डॉक्टरांना दिलासा मिळणार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : राज्यातील सरकारी, महापालिका, वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये एमडी तसेच एमएस असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले बंधपत्रित निवासी डॉक्टर सेवा बजावत आहेत; परंतु बंधपत्रित डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड रेसिडेंट डॉक्टर्स (एमएबीआरडी) या संघटनेतर्फे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना डॉक्टरांच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.

मंगळवारी (ता. २२) वैद्यकीय शिक्षण व संशोधनाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, तसेच सचिवांशी बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठकही झाली. यात डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे एमएबीआरडी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रणव जाधव यांनी सांगितले. ‘वन पोस्ट वन पेमेंट’ मागणीनुसार सर्व बंधपत्रित निवासी डॉक्टरांना समान वेतन देण्यात यावे. किमान वेतन एक लाख इतके मिळण्याची अपेक्षा ठेवण्यात आली होती. तसेच ट्युटर पद फक्त एमएससीसाठी राखीव ठेवण्यात आले असून, ट्युटर, रजिस्ट्रार तसेच एसएमओपदी काम करणाऱ्या बंधपत्रित निवासी डॉक्टरांना वरिष्ठ निवासी डॉक्टर पदाचा अनुभव व समान वेतन देण्यात यावे, तर तिसऱ्या मागणीत बंधपत्रित निवासी डॉक्टरांना रुग्णालय परिसरात राहण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर बोलताना डॉ. प्रणव जाधव यांनी सांगितले, की मंगळवारी वैद्यकीय शिक्षण सचिवांशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली.