Measles Disease : मुंबईत गोवरची साथ बळावतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles Infection
मुंबईत गोवरची साथ बळावतेय

Measles Disease : मुंबईत गोवरची साथ बळावतेय

मुंबई : मुंबईत गोवरबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस भर पडत आहे. गुरुवारी (ता. २४) गोवंडी येथे राहणाऱ्या ८ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याने मुंबईत मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून यापैकी ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहेत; तर दिवसभरात १९ रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या २५२ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत गोवरचा झपाट्याने प्रसार होत असून बालकांची योग्य काळजी घ्यावी आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे.

मुंबईत सोमवार ते गुरुवार सलग चार दिवस गोवर संशयित मृत्यू नोंदवण्यात येत आहेत. त्यातच गुरुवारी गोवर रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले. अहवालानुसार गुरुवारी १९ नवे गोवरच्या निश्चित रुग्णांची नोंद करण्यात आली. यात सी वॉर्ड १, डी १, ई २, जी दक्षिण २, के पश्चिम २, पी दक्षिण १, एल वॉर्ड २, एम पूर्व २, एम पश्चिम ३, एन १, एस १; तर टी वॉर्डमध्ये १ रुग्ण आढळला. मुंबईत दिवसभरात गोवरचे १६१ संशयित रुग्ण आढळले असून ही रुग्णसंख्या ३,६९५ वर पोहोचली आहे. मुंबईत सद्यस्थितीत २१ रुग्ण ऑक्सिजन, ५ रुग्ण आयसीयूमध्ये; तर २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

गुरुवारी निश्चित झालेल्या गोवर मृत्यूतील आठ महिन्यांचा मुलगा गोवंडी परिसरातील असून त्याला २० नोव्हेंबरपासून ताप तसेच पुरळ येऊन श्वसनाच्या त्रासाला सुरुवात झाली. त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. २१ नाव्हेंबरला त्याची प्रकृती सुधारत नसल्याने विशेष रुग्णालयात सायंकाळच्या सुमारास दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले; मात्र गुरुवारी त्याची स्थिती खालावत जाऊन दुपारी १ वाजता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या शरीरातील अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

२३३ खाटा रिक्त
मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा, गोवंडी शिवाजीनगर प्रसूतिगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० खाटा उपलब्ध केल्या आहेत. त्यापैकी ९७ खाटांवर रुग्ण असून २३३ खाटा रिक्त आहेत.

लसीकरणाचे आवाहन
१) भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप भागात गोवरचा उद्रेक.
२) गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेतर्फे बालकंच्या लसीकरणावर भर दिला जात आहे.
३) पालकांनी बालकाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

गोवरचा आढावा
- १६१ संशयित रुग्णांची नोंद
- ३६ रुग्णांना डिस्चार्ज
- ३४ रुग्ण उपचारासाठी दाखल
- ४६,०३,३८८ घरांचे सर्वेक्षण