गोवर लशीबाबत संकोच दूर करण्याचे प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवर लशीबाबत संकोच दूर करण्याचे प्रयत्न
गोवर लशीबाबत संकोच दूर करण्याचे प्रयत्न

गोवर लशीबाबत संकोच दूर करण्याचे प्रयत्न

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिकेने गोवरसाठी अतिरिक्त लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत निराधार लोकसंख्येचाही समावेश आहे. या लसीकरण मोहिमेची माहिती देण्यासाठी सध्या आरोग्यसेवक गल्लोगल्ली फिरत आहेत. याच मोहिमेदरम्यान सोमवारी (ता. २१) अशी २२ मुले सापडल्याचे समोर आले आहे. कुर्ल्यातील सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक लोकमान्य टिळक टर्मिनसच्या आजूबाजूला पदपथावर राहणाऱ्या नागरिकांचेही लशीसंदर्भात समुपदेशन करत आहेत.

स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनंतरही पालक मुलांना लस देण्यास तयार होत नाहीत. स्वयंसेवकांनी कसेबसे मुलांना ‘अ’ जीवनसत्वाचे डोस देण्यासाठी तयार केले; मात्र गोवरची लस देण्यासाठी स्वयंसेवक पालकांकडे गेल्यास त्यांची धांदल उडत आहे. दिवसा जेव्हा आरोग्य कर्मचारी मुलांच्या घरी जातात, तेव्हा पालक कामावर असतात आणि त्यामुळे त्यांना लशीची परवानगी देण्यासाठी घरी कोणीही नसते. इतर घटनांमध्ये, भीतीमुळे पालक लस घेण्यास स्पष्टपणे नकार देतात. या समस्येचा सामना करण्यासाठी जी उत्तर प्रभागाच्या (दादर आणि माहीम) अधिकाऱ्यांनी एक विशेष लसीकरण पथक नेमले आहे. हे पथक निराधार लोकसंख्या असलेल्या भागात जाऊन जनजागृती करत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी सांगितले.

आरोग्य सेवकांचे असेही अनुभव
जोपर्यंत पालक मुलांना लसीकरण देण्यास तयार होत नाहीत, तोपर्यंत ते पालकांकडे जात राहते. अनेकदा पालकांकडून मुलांना लस न दिल्यामुळे सर्वस्वी जबाबदारी पालकांची आहे, अशा आशयाने स्वाक्षरी घेतली जाते. कधी कधी सध्या रुग्णालयात गोवरमुळे आजारी असलेल्या मुलांची माहिती देऊनही पालक लस देण्यास तयार होत नाहीत, असा अनुभव आरोग्य स्वयंसेवक सांगतात.

निराधार लोकांमध्ये लशीला नकार देण्याचे प्रमाण खूप आहे. मूल आधीच आजारी आहे, असे कारण अनेकदा दिले जाते. त्यामुळे डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे वारंवार समुपदेशन करावे. आम्हाला यासाठी स्थानिक समुदायाच्या नेत्यांचा, अगदी धार्मिक नेत्यांचाही पाठिंबा मिळाला आहे.
- डॉ. रश्मी शिरगावकर, वैद्यकीय अधिकारी, बी वॉर्ड (डोंगरी, पायधुनी, भेंडी बाजार)