राऊतांच्या जामिनविरोधी याचिकेवर सुनावणीस नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतांच्या जामिनविरोधी याचिकेवर सुनावणीस नकार
राऊतांच्या जामिनविरोधी याचिकेवर सुनावणीस नकार

राऊतांच्या जामिनविरोधी याचिकेवर सुनावणीस नकार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना मंजूर झालेल्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्या. मकरंद कर्णिक यांनी आज नकार दिला. राऊत यांना विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला; परंतु हा जामीन रद्दबातल करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

राऊत यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर आज न्या. कर्णिक यांच्यापुढे सुनावणी होणार होती; मात्र न्या. कर्णिक यांनी सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकेवर माझ्याकडे सुनावणी घेणे योग्य होणार नाही. त्यामुळे अन्य न्यायालयात सुनावणी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता नव्या न्यायाधीशांपुढे यावर सुनावणी होऊ शकेल. दरम्यान, ईडी स्वतःच्या मर्जीने आरोपींना अटक करत आहे आणि मुख्य आरोपींना अद्याप अटकच केलेली नाही, असा विरोधाभास विशेष न्यायालयाने स्पष्ट केला आहे. राऊत सुमारे १०२ दिवस कारागृहात होते. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रखडला असून यामध्ये हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

शेरेबाजीवर आक्षेप
खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीच्या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राऊत यांची अटक अनावश्यक असल्याचेही नमूद केले आहे. ईडीने मात्र या जामिनाला विरोध करत न्यायालयाच्या शेरेबाजीवरही याचिकेत आक्षेप घेतला आहे.