आनंद तेलतुंबडे कारागृहाबाहेर येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद तेलतुंबडे कारागृहाबाहेर येणार
आनंद तेलतुंबडे कारागृहाबाहेर येणार

आनंद तेलतुंबडे कारागृहाबाहेर येणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २५ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवत राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एनआयएला चांगलाच झटका बसला आहे. या निकालामुळे तेलतुंबडे यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तेलतुंबडे दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात होते.

मुंबई उच्च न्यायालयाने तेलतुंबडे यांना मागील आठवड्यात सशर्त जामीन मंजूर केला; मात्र एनआयएने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी अवधी मागितल्यामुळे न्यायालयाने आजपर्यंत जामिनाला अंतरिम स्थगिती दिली होती. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला; मात्र उच्च न्यायालयाने निकालात दिलेले निरीक्षण खटल्याच्या वेळी अंतिम निरीक्षण म्हणून नोंदवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

११ आरोपी कारागृहातच
१) तेलतुंबडे हे बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी सक्रियपणे संबंधित होते, असा आरोप एनआयएने केला आहे. तसेच या संघटनांच्या सदस्य नोंदणीत, दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी होते, असे एनआयएने म्हटले आहे. तेलतुंबडे यांचा लहान भाऊ, आरोपी मिलिंद तेलतुंबडेचा गडचिरोलीमध्ये पोलिस चकमकीत मृत्यू झाला आहे.
२) उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात तेलतुंबडे यांच्यावर दहशतवादी कारवाया, कटकारस्थान प्रथमदर्शनी आढळत नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना जामीन मंजूर झाला आहे; तर आरोपी गौतम नवलखांना नजरकैदेत राहण्याची परवानगी मिळाली आहे. या प्रकरणातील ११ आरोपी अद्यापही कारागृहात आहेत.