सेन्सेक्सचा उच्चांक कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्सचा उच्चांक कायम
सेन्सेक्सचा उच्चांक कायम

सेन्सेक्सचा उच्चांक कायम

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : जागतिक थंड वातावरणामुळे आज सेन्सेक्स व निफ्टी जवळपास स्थिर राहिले. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती या बड्या शेअरच्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सने आज सलग दुसऱ्या दिवशीही सार्वकालिक उच्चांक नोंदवला. आज सेन्सेक्स २०.९६ अंश, तर निफ्टी २८.६५ अंश वाढला.

आज जागतिक वातावरण संमिश्र होते. अमेरिकी शेअर बाजार बंद होते, तर युरोप आणि आशिया तोटा दाखवत होते. तरीही रिलायन्स, विप्रो, मारुती तसेच खासगी बँका आदींच्या शेअरच्या खरेदीमुळे दिवसाअखेर सेन्सेक्स ६२,२९३.६४ अंशावर, तर निफ्टी १८,५१२.७५ अंशावर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकात आज अत्यल्प वाढ झाली असली तरीही सेन्सेक्सने दिवसभराच्या व्यवहारादरम्यान ६२,४४७.७३ अंश असा सार्वकालिक उच्चांक नोंदवला.

आज अमेरिकी शेअर बाजार बंद असल्यामुळे गुंतवणूकदारांना बाजाराची दिशा कशी असेल, याबाबत कोणतेही संकेत न मिळाल्यामुळे सर्वजण कुंपणावरच बसून होते. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी पाव टक्क्यांपेक्षाही कमी वाढले. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,२३१ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केल्यानेही वातावरण उत्साही होते. आज रिलायन्स सव्वा टक्क्यांपेक्षाही जास्त वाढला, तर विप्रो, टेक महिंद्र, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, टाटा स्टील, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव वाढले; तर नेसले, कोटक बँक, आयसीआयसीआय, एचसीएल टेक या शेअर्सचे भाव कमी झाले.

भारतीची आर्थिक परिस्थिती बळकट
----------------------------------
जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत असली तरी भारतीय आर्थिक परिस्थिती बळकट आहे. तसेच आपल्या कंपन्यांची कामगिरीही चांगली होत असल्यामुळे निर्देशांक वाढतील अशी खात्री हेम सिक्युरिटीचे फंड मॅनेजर मोहित निगम यांनी व्यक्त केली.