धारावीतील निसर्ग सौंदर्यांची भूरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील निसर्ग सौंदर्यांची भूरळ
धारावीतील निसर्ग सौंदर्यांची भूरळ

धारावीतील निसर्ग सौंदर्यांची भूरळ

sakal_logo
By

मुंबईकरांना हिरवी वने आणि प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणे, नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थी व युवक वर्गांमध्ये, निसर्ग व पर्यावरणाशी संबंधित प्रशिक्षण व जागृती निर्माण करणे या उद्देशाने धारावीत महाराष्ट्र निसर्ग उद्यान उभारण्यात आले. या उद्यानात दरवर्षी शाळकरी विद्यार्थ्यांना आणि मुंबईकर भेट देत असतात. उद्यानातील आयुर्वेदिक वृक्ष आणि राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो.

तेजस वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा

निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली. मुंबई शहराच्या एकेकाळच्या क्षेपण भूमी वर तयार करण्यात आलेले निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या मानव निर्मित जंगलालाच जोडून मिठी नदीच्या पात्रातील तिवराची नैसर्गिक जंगले आहेत. निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत याचा पूर्णपणे विसर पडतो. जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासक उद्यानात येतात. चहुबाजूंनी हिरवीगार झाडे, पाऊलवाट जंगलात आल्याची अनुभूती देतात.
सिमेंट काँक्रीटच्या जंगलात आणि झोपड्या-इमारतींच्या जंगलात आणि आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत निसर्गाची पर्वणी पाहण्यासाठी शेकडो पर्यटक येथे येत असतात.

असे आहे उद्यान

महाराष्ट्र निसर्ग उद्यान १५ हेक्टरचे असून अन्नसाखळीच्या विषयावर आधारित आहे. उद्यानाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत निसर्ग फेरीचे जाळे पसरलेले आहे.

निसर्ग फेरीची एकूण लांबी १.८ किलोमीटर एवढी आहे. निसर्ग फेरीचा पायवाट ही विटांनी बनवलेली आहे आणि जवळजवळ ९० टक्के पायवाट ही विटांची आहे. उद्यानास भेट देणाऱ्या अभ्यांगतांना या पायवाटेवरून उद्यानात फिरवले जाते व निसर्गातील घटकांविषयी माहिती दिली जाते.

उद्यानात तीन प्रकारच्या निसर्गफेरी आहेत. यापैकी मुख्य निसर्ग फेरीमध्ये उद्यानात असलेले सर्व शैक्षणिक विभाग पाहावयास मिळतात. या फेरीमध्ये असंख्य प्रकारची वनस्पती, पक्षी, कोळी आणि सरपटणारे प्राणी यांना पाहण्याचा आनंद लुटता येतो; तर मध्य निसर्ग फेरीमध्ये फुलपाखरू विभाग, नक्षत्र वन, पावसाळी पाणी साठवणूक आणि जंगल विभाग यांचा समावेश आहे.

खाडीकिनारी आणि फायकस पट्टा फेरीमध्ये झाडा-झुडुपांची; तर दुसऱ्या बाजूला मिठी नदीची झलक पाहावयास मिळते; तर दुसऱ्या बाजूला मिठी नदीमध्ये अनेक प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचा आनंद ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये लुटता येतो. तसेच गाय बगळा, पानकावळा आणि खंड्या हे पक्षी या फेरीमध्ये नियमितपणे दिसतात.

शाळा/ महाविद्यालये/ संस्था यांसाठी निसर्ग फेरीचे वेळापत्रक
महाराष्ट्र निसर्ग उद्यानामध्ये निसर्ग फेरीचा आनंद लुटायचा असेल तर भेट देण्याच्या तारखेच्या आठवडाभर आधी दूरध्वनीवरून सकाळ/ दुपार सत्र राखून ठेवायला सांगणे गरजेचे आहे. तसेच एक पत्र संचालक, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, धारावी यांच्या नावे सादर करणे गरजेचे आहे.

अभ्यागतांनी भेट देण्याची वेळ : सकाळी ८.३० ते दुपारी ३.३०

महिन्याला २००० ते ३००० विद्यार्थी भेट देतात

उद्यानातील जैवविविधता

पक्षी- १२५ प्रजाती, फुलपाखरू- ८५ प्रजाती, उभयचर आणि सरपटणारे प्राणी- २० प्रजाती

धरावीसारख्या माणसांनी गजबजलेल्या ठिकाणी महाराष्ट्र निसर्ग उद्यान वसले आहे. याची कल्पना करणे अनेकांसाठी अशक्य आहे. उद्यान हे मुंबईमधील जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहे. उद्यानात फेरफटका मारला तर सध्या ३० प्रकारची फुलपाखरे आणि ४० प्रकारचे पक्षी आढळून येतात. त्याचप्रमाणे उद्यानात १२० प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत.
- महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था