
अनिल देशमुख यांच्या मुलाला सशर्त जामीन
मुंबई, ता. २८ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात आरोपी असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश यांना आज विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यासह ऋषीकेश यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश केला. विशेष पीएमएलए न्यायालयात विशेष न्या. राहुल रोकडे यांच्यापुढे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. आजच्या सुनावणीला ऋषीकेश न्यायालयात हजर होते. न्यायालयाने फेब्रुवारीत त्यांना समन्स जारी केले होते.
वडिलांच्या आरोपांप्रकरणी ऋषीकेश यांच्यावर कथित आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच अनिल देशमुख यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे, त्यामुळे ऋषीकेश यांनाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी निकम यांच्याकडून करण्यात आली. तसेच दुसरे पुत्र सलील देशमुख यांनादेखील न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला असला, तरी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात ते अटकेत आहेत.