जीएसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
जीएसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

जीएसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : राज्य वस्तू व सेवा कर विभागाची (जीएसटी) पुनर्रचना व्हावी या प्रलंबित मागणीसाठी काळ्या फिती आणि निदर्शनांसह कर्मचाऱ्यांचे सलग चौथ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू आहे. उद्या (ता. २) राज्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी माझगाव येथील जीएसटी भवनमध्ये दाखल होणार आहेत. जीएसटी भवन परिसरात महानिषेध सभेचेही आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी जाहीर निषेध नोंदवणार आहेत.

जीएसटी कायद्याची अंमलबजावणी २०१७ पासून देशभरात झाली. राज्य व केंद्र सरकारच्या तब्बल १४ करांचे विलीनीकरण होऊन जीएसटी कायदा अस्तिवात आला आहे. त्यामुळे फक्त मूल्यवर्धित कर (व्हॅट) कायद्याची अंमलबजावणी करणे, राज्य कर विभागाची पुनर्रचना करणे अत्यावश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर चार वर्षांपूर्वीच सादर झालेल्या अगरवाल समितीच्या पुनर्रचना अहवालाची अंमलबजावणी तातडीने करावी, या मागणीसाठी संघटना वारंवार सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु सरकार त्याच्यावर वेळकाढू धोरण अवलंबत असून, त्यामुळे जीएसटी संकलनाचे काम पूर्ण क्षमतेने होत नाही, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी केला आहे.

सरकारचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजपत्रित अधिकारी संघटना राज्यभरातील कार्यालयांसमोर २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती आणि निदर्शनांसह ठिय्या आंदोलन करीत आहेत. तरीही सरकारने दखल न घेतल्याने उद्या (ता. २) दुपारी माझगाव मुख्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जाहीर निषेध सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतरही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास काम बंद अथवा बेमुदत संप अधिक तीव्रतेने करण्याचा इशारा सरचिटणीस विजय कुंभार यांनी दिला आहे.