
गोवर लशीसाठी फोनवरून विचारणा
मुंबई, ता. १ : मुंबईतील गोवरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. अधिकाधिक बालकांचे लसीकरण व्हावे यासाठी लस घेण्यास आठवण करून देणारा फोन महापालिकेकडून करण्यात येणार आहे.
आतापर्यंत महापालिकेकडून गृहभेटी देत पालकांना गोवर लसीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण शिबिरात जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जाते; मात्र अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नियमित भेटीसह लसीकरणाच्या एक दिवस आधी पालकांना लसीकरणाची आठवण करून देण्यासाठी फोन करण्याची सूचना केली आहे. गोवरच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाधिक लाभार्थ्यांनी लस घेतली पाहिजे याकडे लक्ष दिले जात आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देत लसीकरण शिबिराची माहिती देत आहेत. आता ज्या दिवशी मुलाचा डोस असेल, त्याच्या आदल्या दिवशी फोन करून उद्याच्या डोसची आठवण पालकांना करून देण्यात येणार असल्याचे डॉ. संजीव कुमार म्हणाले.
---
पूर्व उपनगरात सर्वाधिक प्रकोप
विभाग---- रुग्ण---- संशयित
कुर्ला ------७ ---------४९
गोवंडी---- ७ ---------७१
चेंबूर------३ ----------११
भांडुप----१ ----------६
घाटकोपर---१ --------५