
प्लास्टीक बंदी आदेशातून पेपर उत्पादने वगळली
मुंबई, ता. २ : सिंगल यूज प्लास्टिक बंदीच्या आदेशात राज्य सरकारने सुधारणा केली असून ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडीचे नॉन वुव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग व पेपर कप, द्रोण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेट या वस्तूंना बंदीतून वगळले आहे.
हा बदल व्हावा, यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने सुरुवातीपासून प्रयत्न केले होते. सरकारने २०१८ च्या अधिसूचनेनुसार या वस्तूंवर बंदी घातली होती. सन २०२२ पासून त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली, त्यामुळे राज्यात या वस्तूनिर्मितीच्या छोट्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सुमारे सहा लाखांहून अधिक लोकांवर बेरोजगारीचा धोका निर्माण झाला होता. मात्र आता या वस्तू वगळण्यासाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियमानुसार बुधवारी राजपत्रित अधिसूचना जाहीर केल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
कंपोस्टेबलचे प्रमाणीकरण
..................................
कंपोस्टेबल (विघटनशील) पदार्थांपासून बनवण्यात आलेले स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कंटेनर अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याचे प्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलोजी आणि केद्रींय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या बाबी प्रमाणित करणे बंधनकारक आहे.