
देशमुखांच्या जामिनावर प्राधान्याने सुनावणी हवी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मनिलॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर प्राधान्याने सुनावणी व्हायला हवी, असे प्रथमदर्शनी मत आज मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. येत्या मंगळवारी (ता. ६) यावर सुनावणी होणार आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे; मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन मिळालेला नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.
देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केल्यामुळे त्यांचे सध्याचे वैद्यकीय अहवाल दाखल होणे आवश्यक आहे, त्यांना योग्य उपचार मिळत आहेत, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी केला; तर देशमुख यांना अनेक गंभीर आजार असून त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे, असे देशमुख यांच्या वतीने ॲड. विक्रम चौधरी यांनी सांगितले. न्या. एम. एस. कर्णिक यांनी जामिनावर मंगळवारी गुणवत्तेच्या निकषांवर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तसेच देशमुख आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे याचिकेवर प्राधान्याने सुनावणी घ्यायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी निश्चित केली आहे.