
धारावी पुनर्वसन प्रकल्पावर ३१ कोटी खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास गेल्या १८ वर्षांपासून रखडला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाने गेल्या १६ वर्षांत प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. प्रकल्पाची एकही वीट रचली नसतानाही प्रकल्पावर आजवर ३१.२७ कोटी रुपये खर्च झाला आहे. माहिती अधिकारात ही गोष्ट समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर आजमितीस झालेल्या खर्चाची माहिती विचारली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गलगली यांना मागील १५ वर्षांत करण्यात आलेल्या खर्चाची माहिती दिली आहे.
१ एप्रिल २००५ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत प्रकल्पाने ३१ कोटी २७ लाख ६६ हजार १४८ रुपये पुनर्विकासाच्या कामासाठी खर्च केले आहेत; तर पीएमसी शुल्कावर १५ कोटी ८५ लाख खर्च केला आहे. जाहिरात आणि प्रसारावर ३ कोटी ६५ लाख इतकी रक्कम खर्च करण्यात आली. व्यावसायिक शुल्क आणि सर्व्हेवर ४ कोटी १४ लाख खर्च झाले आहेत. तसेच विधी शुल्कावर २ कोटी २७ लाख खर्च करण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (डीआरपी) शासन निर्णय ४ फेब्रुवारी २००४ रोजी जारी करण्यात आला. मागील १८ वर्षांत एक इंचाचाही पुनर्विकास झाला नसून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे. अखेर धारावी पुनर्विकासासाठी मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अदाणी प्रॉपर्टीजची ५०३९ कोटींची निविदा सरस ठरली आहे.